News Flash

आयव्हीएफ उपचार पध्दती सुरू असताना ‘घ्या’ ही काळजी

या काळात स्त्रियांना मानसिक आरोग्य जपण्याची विशेष गरज असते

डॉ. रितु हिंदुजा

टेस्ट टयूब बेबी किंवा इन व्रिटो गर्भधारणा (आयव्हीएफ) ही वंधत्व निवारणावरील सर्वात उत्तम आणि आधुनिक उपचार पध्दती आहे. या उपचार पध्दती घेत असताना अनेक जोडप्यांना मानसिक व शारीरिक त्रासातून जावं लागतं. त्यामुळे अति ताणामुळे स्त्री व पुरुष या दोघांच्या फर्टीलिटीवर त्याचा विपरित परिणाम होतो. आयव्हीएफ उपचार पध्दती सुरु असताना जोडप्यांनी मानसिक तणावापासून दूर राहणे गरजेचं आहे. परंतु, सध्याच्या काळात प्रत्येकावर कामाचा ताण प्रचंड वाढला आहे. त्यातच बदललेली जीवनशैली, आहारात झालेला बदल या सर्व गोष्टींमुळे जवळ जवळ ३०-४० टक्के लोकांमध्ये नैसर्गिकरित्या गर्भधारणा होण्यास अडचण निर्माण अशा जोडप्यांकरिता आयव्हीएफ उपचार पध्दती ही जणू वरदान ठरत आहे.
बाळाच्या योग्य वाढीसाठी आई आनंदी असणं गरजेचं आहे. त्यामुळे गरोदर स्त्रीने कायम हसत राहणं गरजेचं आहे. या काळात स्त्रीच्या मनावर कोणताही आघात झाला तर तो थेट बाळासाठी घातक ठरु शकतो. तसंच आयव्हीएफ उपचार सुरु असताना स्त्रियांना मानसिक आरोग्य जपण्याची विशेष गरज असते. चला तर जाणून घेऊयात या काळत महिलांनी कोणती काळजी घ्यावी.

१. स्वतःची काळजी घ्या –
महिलांनी या काळात आरोग्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. सकस आहार घेऊन कायम आनंदी असणं गरजेचं आहे. त्यामुळे ताणतणाव टाळण्यासाठी ध्यानधारणा, योगाभ्यास करा. आवडत्या छंदांमध्ये स्वतःला गुंतवून घ्या. ज्यातून तुम्हाला आनंद मिळेल अशा गोष्टी करा. गरज भासल्यास समुपदेशनाचा आधार घ्या.

२. प्रियजनांसोबत वेळ घालवा –
आपल्या नकारात्मक भावनांना दूर लोटा आणि सकारात्मक भावनांचा स्वीकार करा. या काळात आपल्या प्रियजनांच्या सहवासात रहा. जेणेकरून असुरक्षिततेची भावना निर्माण होणार नाही. ज्यांनी यापूर्वी आयव्हीएफ उपचार पध्दतीचा अवलंब केला होता अशा जोडप्यांशी संवाद साधा.

३. योग्य वजन राखा –
लठ्ठपणामुळे अंडकोषाच्या क्रियेत बाधा येऊन स्त्रियांवर परिणाम होतो. ज्या महिला कमी वजनाच्या आहेत त्यांनादेखील अंडकोशांच्या समस्येची जोखीम वाढते. ज्यामुळे वंध्यत्व होऊ शकते. प्रत्येकास योग्य बीएमआय राखून ठेवण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे जेणेकरुन वंध्यत्व टाळता येईल. पुरुषांमधील लठ्ठपणा शुक्राणूंची संख्या आणि शुक्राणूंची गतिशीलता प्रभावित करू शकतो. जास्त वजन हार्मोनमध्ये बदल घडविते ज्यामुळे वंध्यत्वाचे कारण होऊ शकते.

४. डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करा –
आरोग्यविषयक कोणतीही शंका असल्यास थेट डॉक्टरांशी संवाद साधा. आपल्या मनाने कोणतीही औषधे घेऊ नका, तसंच डॉक्टरांनी दिलेल्या नियमांचं नीट पालन करा. भरपूर विश्रांती घ्या, योग्य आहार आणि वेळेवर औषधे घ्या.

आयव्हीएफ उपचार पध्दत म्हणजे काय?

आयव्हीएफ उपचार पध्दतीत शुक्रजंतुच्या मदतीने बीजफलन केले जाते आणि त्यानंतर हे फलित बीज गर्भाशयात सोडले जाते, जेणेकरून एक सुदृढ गर्भ आकारास येऊ शकेल. आयव्हीएफ उपचार पद्धतीमध्ये अगदी सुरूवातीस रूग्णास गोनॅडोट्रोफिन्सची (पुनरूत्पादक संप्रेरके) इंजेक्‍शन्स (अंडाशयास उत्तेजित करण्यासाठी) दिली जातात. त्यानंतर जनरल ऐनेस्थेशिया (संपूर्ण भूल) देऊन उसाईट पिकअप नावाची एक छोटी प्रक्रिया केली जाते, ज्यामध्ये अंडाणु पूर्वस्थितीत येण्यासाठी अल्ट्रासाउंड मशीनचा वापर केला जातो. इनक्‍युबेटरमध्ये बीज सुरक्षितपणे स्थापित केल्यानंतर शुक्रजंतू आणि बीज यांना एकत्र आणण्यासाठी इन्ट्रा सायटोप्लास्टिक स्पर्म इंजेक्‍शन (आयसीएसआय) दिले जाते. या पद्धतीमध्ये प्रत्येक शुक्रजंतुबरोबर प्रत्येक बीज स्वतंत्रपणे इंजेक्‍ट केले जाते. एकदा ही बीज फलनाची प्रक्रिया पार पडली की त्यातून तयार झालेले गर्भ वेगवेगळ्या काळासाठी इनक्‍युबेटरमध्ये ठेवले जातात. हा कालावधी संपल्यानंतर त्यापैकी उत्कृष्ट गर्भ निवडून गर्भाशयामध्ये पुनःस्थापित केले जातात. या प्रक्रियेस एम्ब्रयो ट्रान्सफर (ईटी) असे म्हटले जाते.

(लेखिका डॉ. रितु हिंदुजा या नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी,मुंबई येथे फर्टिलिटी कन्सल्टंट आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2020 2:51 pm

Web Title: ivf technology to have kids pregnancy care ssj 93
Next Stories
1 उष्णतेपासून लहान बाळांचं करा असं संरक्षण
2 दररोज खा एक-दोन लवंग; होतील ‘हे’ फायदे
3 उत्तम दृष्टीपासून ते कोलेस्टेरॉल नियंत्रणापर्यंत… जाणून घ्या अंडी खाण्याचे पाच फायदे
Just Now!
X