13 August 2020

News Flash

दिमाखदार ‘जॅकेट’ची ऊब

पूर्वी थंडीपासून बचाव करण्यासाठी ‘स्वेटर’ एकमेव उपाय होता. आता त्यात अनेक फॅशनेबल पर्याय उपलब्ध आहेत.

बाजारात अनेक प्रकारचे कोट्स आणि जॅकेट्स उपलब्ध आहेत

उशिराने का होईना अखेर डिसेंबर महिन्यात वातावरणात गारवा जाणवू लागला आहे. सकाळ-संध्याकाळी थंडीची चाहूल लागली आहे. हल्ली मुंबईकरांच्या नशिबी दोनच ऋतू आहेत. एक जनजीवन विस्कळीत करणारा पावसाळा आणि गरमीने जिवाची घालमेल होणारा उन्हाळा. या दोघांच्या मध्ये महिना-दीड महिन्यापुरता हिवाळा अवतरतो. थंडी अगदी औट घटकेची असली तरी ठाणे-नवी मुंबईकर तिचे उत्साहाने स्वागत करतात. या थंड वातावरणात उबदार कपडय़ांची खरेदी केली जाते. पूर्वी थंडीपासून बचाव करण्यासाठी ‘स्वेटर’ हा एकमेव उपाय होता. आता त्यात अनेक फॅशनेबल पर्याय उपलब्ध आहेत.
कडाक्याच्या थंडीत सकाळी उशिरापर्यंत झोपणे आवडत असले तरी शाळा-महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी तसेच नोकरदारांना भल्या पहाटे घर सोडावेच लागते. अशा वेळी उबदार कपडे उपयोगी ठरतात. अनेकजण याच काळात बाजारात, रस्त्यावर दुकान मांडून बसलेल्या तिबेटीयन अथवा नेपाळी विक्रेत्यांकडून स्वेटर्स विकत घेतात. त्याचप्रमाणे शोरूम्समधील ब्रॅण्डेड उबदार कपडेही खरेदी केले जातात.
आपापल्या कुवतीनुसार, ऐपतीनुसार यांपैकी योग्य दुकानावर आपली नजर स्थिरावते आणि आवडीनुसार जॅकेट्स विकत घेतले जाते. शहरातील या दुकानांपेक्षा सध्या जॅकेट्स खरेदीसाठी ग्राहकांकडून ‘ऑनलाइन संकेतस्थळांना’ जास्त पसंती मिळाल्याचे चित्र आहे. जॅकेट्सचे विविध प्रकार, किमतीत सवलत, फ्री होम डिलव्हरी अशा विविध प्रकारच्या सेवा ऑनलाइन संकेतस्थळांच्या माध्यमातून मिळत असल्यामुळे ग्राहकांची त्यांना जास्त पसंती मिळत आहे. लहान मुलांसाठी खास ‘टॉम अँण्ड जेरी’सारखी कार्टूनची चित्र असणारी मनोरंजक जॅकेट्स बाजारात उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे फुटबॉलचे चित्र असणारी खेळाची जॅकेट्सही आहेत.
सध्या बाजारात अनेक प्रकारचे कोट्स आणि जॅकेट्स उपलब्ध आहेत. या दोन्ही प्रकारात अनेक पर्याय उपलब्ध असल्याने निवड करताना संभ्रमात पडायला होते. कोणत्या ग्राहकाला कोणते जॅकेट प्राधान्याने दाखवावे, हा प्रश्न विक्रेत्यासमोर नेहमीच उभा राहतो. जॅकेट निवडीच्या वेळी होणारा संभ्रम टाळायचा असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते.
१. कोणत्या प्रकारचे जॅकेट घ्यायचे आहे, हे आधी निश्चित करा.
२. स्टाइल, मटेरिअल (उत्पादकीय घटक) आणि अन्य घटक निश्चित करून जॅकेटची निवड करा.

डोंबिवलीत नेपाळी, तिबेटी विक्रेत्यांचा बाजार..
डोंबिवलीतील पेंढरकर महाविद्यालयाजवळ कर्नाटक तसेच नेपाळ, तिबेट येथून विक्रेते स्वेटर विकण्यासाठी आले आहेत. मेघालय, पंजाब, नेपाळ येथील माल ते विक्रीसाठी कल्याण-डोंबिवलीत आणतात. साधारण ५०० ते हजार रुपयांपर्यंतचे विविध प्रकारांतील स्वेटर्स त्यांच्याकडे विक्रीसाठी आले आहेत. त्यात लोकरीच्या स्वेटरपासून जर्कीग, जॅकेट, कानटोपी, लहान मुलांचे स्वेटर असे ऊबदार कपडे विक्रीस आहेत.

काही जॅकेटचे प्रकार
’पार्का कोट : थंडीत सगळ्यात जास्त उबदारपणा देणारे जॅकेट म्हणजे ‘पार्का कोट्स.’ पार्का कोट्स लांबीला मांडीपर्यंत येतात. त्याचप्रमाणे पार्का कोटला लांब बाह्य़ा असतात. त्यामुळेच आपल्या शरीराचा बहुतेक भाग या जॅकेटमुळे झाकला जातो. पार्का कोट्सला पुढच्या बाजूला झीप असते आणि मागच्या बाजूला हूड असते. ‘हूड’ (डोक्यासाठी टोपी) असणाऱ्या जॅकेट्सला तरुणाईची विशेष पसंती मिळताना दिसते. संपूर्ण कुटुंबासाठी पार्का कोट्स घ्यायचे असतील तर तसेही पर्याय ऑनलाइन संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत.
’पि कोट : पि कोट या जॅकेट प्रकाराला ‘पि जॅकेट’ किंवा ‘पायलट जॅकेट’ या नावानेही ओळखले जाते. पि कोट साधारण नेव्ही ब्ल्यू रंगामध्ये पाहायला मिळतात. सुरुवातीला युरोपातील खलाशी आणि कालांतराने अमेरिकन खलाशी पि जॅकेटचा वापर करीत होते. पि कोट घातल्यानंतर माणूस राजेशाही थाट केल्यासारखाच भासतो. पि कोटला लांब बाह्या असतात तर त्याची कॉलर रुंद असते. पि कोटचा आकार त्याच्या डिझाइननुसार बदलतो. पुरुष आणि महिला या दोघांसाठी पि कोट उपलब्ध आहेत.
’पफर कोट : थंडीच्या दिवसात अधिक उबदारपणा देणारे जॅकेट म्हणजे पफर कोट. पफर कोटवर साधारणपणे आडव्या पट्टय़ांचे डिझाइन किंवा ‘क्विल्टेड’ नमुना पाहायला मिळतो. जलरोधक (वॉटरप्रूफ) पफर कोटही बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे पाणी लागून पफर कोट्स खराब होण्याची भीती नसते. पफर कोटला जाड कॉलर, लांब बाह्य़ा असतात. त्याचप्रमाणे पुढच्या बाजूला झिप असते. विविध लांबीमध्ये पफर कोट उपलब्ध आहेत.
’बोलेरो/श्रग : सध्या मुलींमध्ये फॅशनेबल म्हणून ओळखला जाणारा जॅकेट्सचा प्रकार म्हणजे बोलेरो. बोलेरो जॅकेट्सना ‘श्रग’ म्हणूनही संबोधले जाते. श्रगचा वापर फॅशनेबल जॅकेट म्हणून केला जातो. कोणत्याही प्रकारच्या कपडय़ांवर श्रग साजेसे वाटत असल्याने त्याचा सर्रास वापर होतो. विविध प्रकारच्या बाह्य़ांमध्ये श्रग उपलब्ध असून पुढील बाजूस श्रग मोकळे असतात.
’मिलिटरी जॅकेट्स : मिलिटरी जॅकेट्सचे वेड तरुण मुलांमध्ये मोठय़ा प्रमाणात पाहायला मिळतो. बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्ये कलावंतही जॅकेट्स वापरताना दिसतात. साहजिकच याचे अनुकरण तरुण मंडळी करतात. भरपूर खिसे, स्ट्रेट किंवा फिटेड कट, विविध प्रकारच्या कॉलर्स अशा विविध वैशिष्टय़ांमुळे मिलेटरी जॅकेट्स नेहमीच चर्चेचा विषय बनतात.

जॅकेट येथे मिळतील?
पेंढारकर महाविद्यालयजवळ, डोंबिवली (पू.)
किंमत- रुपये ५०० ते १०००.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2015 3:06 am

Web Title: jacket demand in winter session
Next Stories
1 मुंबईमध्ये पहिल्यांदाच भरणार ‘कौटुंबिक खाद्य जत्रा’
2 मधुमेहींसाठी गुळापासून चॉकलेट, लवकरच बाजारात!
3 अ‍ॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धती विधेयक मंजूर
Just Now!
X