बर्गर्स, फ्राइज, बिस्किट्स, फसफसणारी पेये यांच्या अतिसेवनाने मूत्रपिंडाचे विकार व मधुमेह होतो, असे नव्या अभ्यासात म्हटले आहे. टाइप २ मधुमेहाचा संबंध लठ्ठपणाशी असतो व जगात त्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. टाइप २ मधुमेहात शरीर पुरेशा प्रमाणात इन्शुलिन तयार करू शकत नाही किंवा तयार झालेल्या इन्शुलिनला प्रतिसाद देऊ शकत नाही, त्यामुळे ग्लुकोज साखर रक्तात साठत जाते. त्याचे दीर्घकालीन वाईट परिणाम होतात. मूत्रपिंडांना त्यामुळे धोका निर्माण होऊन मधुमेह जडतो. मूत्रपिंडात ग्लुकोजचे पुन्हा होत असलेले शोषण थांबवण्यासाठी उपाय क रणे गरजेचे आहे. ब्रिटनमधील अँग्लिया रस्कीन विद्यापीठात प्राण्यांच्या नमुन्यांवर होणारे परिणाम तपासण्यात आले असता त्यात लठ्ठपणा व इन्शुलिन प्रतिरोधाबाबत नवीन निष्कर्ष हाती आले आहेत. जास्त साखर किंवा मेदाने ग्लुकोजच्या मूत्रपिंडाकडे वहनावर परिणाम होतो. उंदरांना चीज, चॉकलेट बार्स, बिस्कीट, मार्शमॅलोज आठ आठवडे देण्यात आले. म्हणजेच त्यांना ६० टक्के जास्त चरबी व साखर असलेले पदार्थ देण्यात आले. संशोधकांनी केलेल्या चाचण्यांमध्ये रक्तसाखरेचे प्रमाण आहारामुळे वाढलेले दिसले. ग्लुकोज मूत्रपिंडाकडे वाहून नेणाऱ्या घटकांत वाढ झाली. टाइप १ व टाइप २ मधुमेहाच्या उंदरांवर आहाराचे परिणाम तपासण्यात आले. त्यात जीएलयूटी व एसडीएसटी हे ग्लुकोजवाहक व त्यांचे नियंत्रक प्रथिन टाइप २ मधुमेही उंदरांत जास्त दिसून आले. जास्त मेद असलेल्या जंकफूडमुळे हे परिणाम दिसून आले आहेत. पाश्चिमात्य आहारात प्रक्रिया केलेले जंकफूड जास्त असते. त्यामुळे अशा आहारातून लठ्ठपणा व मधुमेह वाढतो असे अँग्लिया रस्कीन विद्यापीठाचे हॅवावी चिंगेर यांनी सांगितले. टाइप १ व टाइप २ मधुमेहात ग्लुकोज वाहकात बदल होतात, त्याचे कारण मेदयुक्त जंकफूड हे आहे. आहारातून साखरेचे नियंत्रण केले तर मूत्रपिंडावर कमी ताण येतो. संबंधित मधुमेहावर काही प्रथिनांचे काम थांबवणारी औषधेही शोधता येऊ शकतात, असे ‘एक्सपीरिमेंटल फिजिऑलॉजी’ या नियतकालिकात म्हटले आहे.