झुरळाचे नाव घेतले की आपल्यापैकी अनेकांच्या अंगावर किळस किंवा भीतीमुळे शहारे उभे राहतील. समाजात झुरळाची असणारी हीच नकारात्मक प्रतिमा बदलण्यासाठी जपानमधील एका प्राणीसंग्रहालयात झुरळांचे अनोखे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. पश्चिम जपानमधील यामागुची भागात असणाऱ्या शुनांशी टोकुयामा प्राणीसंग्रहालयातर्फे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात तब्बल १५ प्रजातींची २०० झुरळे पाहता येतील.
कोणत्याही परिस्थितीत तग धरून राहण्याच्या क्षमतेमुळे सध्याच्या घडीला पृथ्वीतलावर झुरळाच्या ४००० जाती उपलब्ध आहेत. शहरीकरणाच्या वाढत्या रेट्याशीही झुरळांनी जुळवून घेतले असून अनेकदा घरातील किचनमध्ये, किंवा रात्रीच्या वेळेत रस्त्यावर फिरणारी झुरळे आढळून येतात. झुरळांच्या त्रासाला कंटाळून त्यांना मारण्यासाठी बाजारात दिवसेंदिवस अनेक उत्पादने येत आहेत. मात्र, वाईट परिस्थितीत सापडलेली ही झुरळे अन्नसाखळीतील अत्यंत महत्त्वाचा दुवा असल्याचे जपानमधील या प्राणीसंग्रहालयाचे म्हणणे आहे. समाजाचा झुरळांकडे पाहण्याचा दृष्टीकोन अत्यंत नकारात्मक असला तरी, झुरळे मृत घटकांच्या विघटनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. झुरळांकडून प्राणी आणि वनस्पतींचे मृत अवशेष खाल्ले जातात. त्यामुळे त्यांच्या विघटनाचा प्रश्न उद्भवत नाही, अशी माहिती प्राणीसंग्रहालयाच्या प्रवक्त्यांनी दिली. दरम्यान, झुरळांमधील शर्यत या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण असेल. यावेळी प्रेक्षकांना झुरळांच्या पळण्याचा थक्क करणारा वेग पाहता येईल. एवढ्यावरच प्रेक्षकांचे समाधान होणार नसेल तर या प्रदर्शनात मादागास्कर येथील दंश करणाऱ्या झुरळांच्या पिंजऱ्यात हात घालण्याचा थरारही अनुभवता येऊ शकेल. ही झुरळे तब्बल दोन ते अडीच इंच लांबीची आहेत.