21 November 2019

News Flash

आसाममध्ये जपानी मेंदुज्वराचे ४९ बळी

या सर्व भागांत रोगाला प्रतिबंध करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

आसाममध्ये या वर्षी ५ जुलैपर्यंत जपानी मेंदुज्वरामुळे एकूण ४९ जणांचा मृत्यू ओढवला असून या रोगाचे १९० रुग्ण आढळले आहेत. सध्या या रोगाचा उद्रेक मोठय़ा प्रमाणावर दिसून येत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री हिमंत बिस्व सर्मा यांनी शनिवारी दिली.

सर्मा यांनी सांगितले की, सध्या कोक्राझार वगळता अन्य सर्व जिल्ह्यांमध्ये जपानी मेंदुज्वराचा प्रसार झालेला आहे. या सर्व भागांत रोगाला प्रतिबंध करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

राज्यात बहुउद्देशीय आरोग्य सेवक, मलेरिया निर्मूलन कर्मचारी आणि मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी या रोगाचे रुग्ण शोधण्यासाठी सर्वेक्षण केले जात आहे. त्यांना रुग्णांच्या रक्ताचे नमुने गोळा करण्यास सांगण्यात आले आहे.

आरोग्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले की, राज्यात जपानी मेंदुज्वराचे संशयित रुग्ण आढळल्यास त्यांना जिल्हा रुग्णालयात विनामूल्य हलविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जपानी मेंदुज्वर (जपानी एन्सीफॅलिटिस) आणि अ‍ॅक्युट एन्सीफॅलिटिस सिंड्रोमच्या रुग्णांसाठी रुग्णालयांत सर्वसाधारण विभागात आणि अतिदक्षता विभागातही खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. रोगनिदान आणि उपचारांचा खर्चही सरकारतर्फे केला जाणार आहे.

या रोगाचा प्रसार झालेल्या भागांत धुरीकरणाची मोहीम राबविली जात आहे. आतापर्यंत एक हजार ९४ गावांमध्ये धुरीकरण करण्यात आले आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. जपानी मेंदुज्वरामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी २४ तास कार्यरत असलेला नियंत्रण कक्ष उघडण्यात आला आहे. सध्या मुलांना लस देण्याची नियमित मोहीम सुरू आहे. सन २०१६-१७ मध्ये २० जिल्ह्यांत प्रौढ व्यक्तींनाही या रोगाला प्रतिबंध करणारी लस देण्यात आली आहे. यंदा प्रौढांमधील लसीकरणासाठी मदत करण्याची तयारी केंद्र सरकारने दाखविली आहे. जपानी मेंदुज्वराची सध्याची साथ संपली की, हे लसीकरण हाती घेतले जाईल, अशी माहिती सर्मा यांनी दिली.

First Published on July 7, 2019 1:08 am

Web Title: japanese encephalitis japanese brain fever
Just Now!
X