News Flash

‘जावा’ला तुफान प्रतिसाद, ऑनलाइन बुकिंग बंद

एकेकाळी भारतीय रस्त्यांवर अधिराज्य गाजवणाऱ्या जावा मोटरसायकलला ग्राहकांचा तुफान प्रतिसाद

(फोटो सौ. जावामोटरसायकल्स डॉट कॉम)

एकेकाळी भारतीय रस्त्यांवर अधिराज्य गाजवणाऱ्या जावा मोटरसायकलला ग्राहकांचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसतोय. महिंद्रा अँड महिंद्राच्या मालकिच्या क्लासिक लीजंड्स या कंपनीच्या पुढाकाराने गेल्या महिन्यात जावा आणि जावा 42 या दोन मोटारसायकल भारतात लाँच केल्या होत्या आणि त्यासाठी ऑनलाइन बुकिंग सुरू होतं. मात्र, ग्राहकांच्या तुफान प्रतिसादानंतर कंपनीने आज(दि.25) मध्यरात्रीपासून ऑनलाइन बुकिंग बंद करण्याची घोषणा केली आहे. सप्टेंबर 2019 पर्यंत ऑनलाइन बुकिंग झाल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. पण, डिलर्सकडे बुकिंग सुरू राहणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

क्लासिक लीजंड्सने दिलेल्या माहितीनुसार, ‘जावा आणि जावा 42 या दोन्ही गाड्यांची डिलिव्हरी मार्च 2019 मध्ये सुरू होईल. त्यापूर्वी 15 फेब्रुवारी 2019 पर्यंत 105 ठिकाणी डिलरशीप सुरू होईल. ऑनलाइन बुकिंगला ग्राहकांचा जास्त प्रतिसाद मिळाल्याने ती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय’. मात्र, किती जणांनी ऑनलाइन बुकिंग केलंय याबाबत कंपनीने माहिती दिलेली नाही.

जावा मोटारसायकलसाठी आतापर्यंत 10 ठिकाणी डिलरशीप सुरू झाली असून यामध्ये दोन पुणे, तीन बेंगळुरू आणि पाच दिल्लीत आहेत. इतर शहरांमध्ये 15 फेब्रुवारी 2019 पर्यंत डिलरशीप सुरू होतील.

किंमत –
दी जावा – 1.64 लाख रु. (एक्स शोरुम दिल्ली)
जावा 42 – 1.55 लाख रु. (एक्स शोरुम दिल्ली)

मध्यप्रदेशमधल्या पिथमपूर इथल्या कारखान्यात जावाचं उत्पादन केलं जात आहे. विशेष म्हणजे जावाची स्वतंत्र ओळख जपण्यात येणार असून गाडीवर महिंद्राचा लोगो लावण्यात येणार नाही व डीलर्स वगैरे वेगळे नेमण्यात येणार आहेत. सध्या अशा प्रकारच्या हायएंड बाईक्सची मोठी चलती असून हार्ले, डुकातीसारख्या विदेशी कंपन्यांच्या मोटरसायकलनाही विशेष मागणी आहे. या पार्श्वभूमीवर एकेकाळी तरूणाईनं उचलून धरलेल्या जावाला आताचा तरूण वर्ग कसं स्वीकारतो हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

इटलीमधल्या वरेसी इथल्या तांत्रिक केंद्रामध्ये जगातील आघाडीच्या इंजिन तज्ज्ञांबरोबर काम केल्यानंतर नवीन जावा तयार करण्यात आल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. या बाईकचं वैशिष्ट्य सांगताना आयुष्यभर साथ देईल असं नमूद करण्यात आलं आहे. इंजिनच्या एगझॉट यंत्रणेवर विशेष मेहनत घेण्यात आली असून योग्य त्या पाईपांची निवड करण्यात आली आहे, ज्यामुळे हवा तो परिणाम साधला गेल्याचा दावा करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2018 2:22 pm

Web Title: jawas motorcycles online bookings closed sold out till september 2019
Next Stories
1 शाओमीने लाँच केला नवा POCO स्मार्टफोन, जाणून घ्या खासियत
2 जाणून घ्या कशी होते ख्रिसमस ट्रीची शेती
3 Merry Christmas 2018 : …म्हणून २५ डिसेंबर रोजी साजरा केला जातो ख्रिसमस
Just Now!
X