मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ या टेलिकॉम कंपनीने सॅन फ्रँसिस्कोमधील मोबाइल गेमिंग कंपनी क्रिकीमध्ये गुंतवणूक केली आहे. मात्र, नेमकी किती गुंतवणूक करण्यात आली याची माहिती जिओकडून देण्यात आलेली नाही. या गुंतवणूकीसोबतच क्रिकीमध्ये आतापर्यंत एकूण 22 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक झाली आहे.

जिओने केलेल्या गुंतवणूकीनंतर क्रिकीने रिलायन्स जिओसोबत “यात्रा” नावाचा एक नवीन ‘ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी’ मोबाइल गेम लाँच केला आहे. रिलायन्स जिओच्या ग्राहकांना हा नवीन गेम 3D अवतारात खेळण्याची विशेष सुविधा मिळेल. हा गेम गुगल प्ले स्टोअर आणि आयओएस स्टोअरवरुन फ्रीमध्ये डाउनलोड करता येईल.

देशभरात गेमिंग इंडस्ट्री झपाट्याने वाढतेय. अनेक नवनवीन कंपन्या येत असून सतत नवे गेम लाँच होत आहेत. पुढील दोन वर्षांमध्ये या इंडस्ट्रीत अजून तेजी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात गेमिंग मार्केटमध्ये दबदबा निर्माण करण्याचा रिलायन्स जिओचा प्रयत्न आहे. जिओने क्रिकीमध्ये केलेल्या गुंतवणूकीकडे त्याच दृष्टीकोनातून पाहिले जात आहे.

याबाबत बोलताना,’क्रिकी, भारतीयांच्या एका पूर्ण पिढीला ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटीला स्वीकारण्यास प्रेरणा देईल. जगभरातील सर्वोत्तम अनुभव भारतीयांना देण्याचं आमचं व्हिजन आहे. ‘यात्रा’ गेम त्या दीशेने टाकलेलं एक पाऊल आहे. ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी गेमिंगमध्ये युजर्सना एका नव्या जगाचा अनुभव मिळतो. जिओ आणि अन्य युजर्सनी ‘यात्रा’ गेमच्या माध्यमातून ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटीची अनुभव घ्यावा”, असं आवाहन जिओचे डायरेक्टर आकाश अंबानी यांनी केलं. तर, “कल्पना आणि वास्तव यांची सांगड घालणं आमचं व्हिजन आहे. ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटीच्या माध्यमातून आम्ही काल्पनिक जगाला तुमच्या फोनद्वारे थेट तुमच्या घरापर्यंत पोहोचवू”, असं क्रिकीचे संस्थापक जाह्नवी आणि केतकी श्रीराम यांनी म्हटलं.