जगातील आघाडीची सोशल मीडिया कंपनी फेसबुकने गेल्या आठवड्यात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 43 हजार 574 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर, आता फेसबुकचीच मालकी असलेल्या इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp च्या मदतीने रिलायन्सने आपल्या ऑनलाइन इ-कॉमर्स पोर्टल JioMart ची सुरूवात केली आहे. Reliance Retail च्या JioMart या इ-कॉमर्स प्लॅटफॉर्मची सेवा सध्या मुंबईच्या काही परिसरात सुरू करण्यात आली आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण या परिसरातील काही निवडक ठिकाणी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. जाणून घेऊया कसा करायचा या सेवेचा वापर –

कसा करायचा या सेवेचा वापर? –

– सर्वप्रथम जिओमार्टच्या सेवेसाठी इच्छुक ग्राहकांना JioMart चा WhatsApp क्रमांक 8850008000 आपल्या फोनच्या कॉन्टॅक्टमध्ये सेव्ह करावा लागेल.

– त्यानंतर या नंबरवर ‘Hi’ असा मेसेज पाठवावा.

– मेसेज पाठवल्यानंतर ग्राहकांना ऑर्डरसाठी जिओमार्टद्वारे एक लिंक मिळते.

– ही लिंक ३० मिनिटांसाठी वैध असते. त्यापेक्षा अधिक वेळ लागल्यास पुन्हा मेसेज पाठवावा लागतो.

– त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर ‘जिओमार्ट’चं पेज ओपन होतं. या पेजवर तुमच्या घराचा पत्ता, फोन नंबर अशाप्रकारची काही माहिती विचारली जाते.

– माहिती भरल्यानंतर ‘Proceed’ वर क्लिक करा

– आता तुमच्यासमोर किराणा दुकानात उपलब्ध असलेल्या सामानाची यादी दिसेल. पण अद्याप या यादीमध्ये अनेक वस्तूंचा समावेश करण्यात आलेला नाही.

– ऑर्डर प्लेस केल्यानंतर एकूण किती रुपये झाले याबाबत माहिती दिली जाईल. पण, सामान स्वीकारतानाच पैसे द्यावे लागतील. यानंतर लगेच एक दुसरा मेसेज पाठवला जाईल.

– या मेसेजमध्ये तुम्हाला जवळील किराणा दुकानाचं नाव, फोन नंबर आणि पत्ता सांगितला जाईल. त्या दुकानातून ऑर्डर केलेलं सामान तुम्ही घेवू शकता.