23 August 2019

News Flash

MG Hector ठरली अव्वल , ‘हॅरियर’ची विक्री 40 टक्क्यांनी घटली

टाटा हॅरियरची अव्वल स्थानावरुन थेट तिसऱ्या स्थानावर घसरण

भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रामध्ये MG Hector ला शानदार प्रतिसाद मिळताना दिसतोय. जुलै महिन्यात या SUV च्या 1,508 युनिटची विक्री झालीये. यासोबतच जुलै महिन्यातील SUV गाड्यांच्या विक्रीमध्ये हेक्टरने अव्वल क्रमांक गाठलाय. हेक्टरच्या लोकप्रियतेचा बाजारातील इतर SUV गाड्यांच्या विक्रीवर परिणाम झाला असून त्यांच्या विक्रीमध्ये लक्षणीय घट झाल्याचं समोर आलंय. याचा सर्वाधिक फटका टाटा हॅरियरच्या विक्रीवर झाला असून जून महिन्यात अव्वल क्रमांकावर असलेली हॅरियर या महिन्यात थेट तिसऱ्या क्रमांकावर गेलीये. तर, महिंद्रा XUV 500 ने दुसरा क्रमांक गाठलाय.

हॅरियरच्या विक्रीवर परिणाम –
एकीकडे जुलै महिन्यात हेक्टरच्या 1,508 युनिट्सची विक्री झाली असताना, टाटा हॅरियरच्या केवळ 740 युनिट्सची विक्री झालीये. यापूर्वी जून महिन्यात हॅरियरच्या 1,216 युनिट्सची विक्री झाली होती. म्हणजेच हॅरियरच्या विक्रीत जवळपास 40 टक्क्यांची घट झाली आहे.

महिंद्रा XUV 500 आणि Jeep Compass च्या विक्रीत घट –
जून महिन्यात महिंद्रा XUV 500 च्या 1,129 युनिट्सची विक्री झाली होती. मात्र, जुलै महिन्यात केवळ 1,116 युनिट्सचीच विक्री झालीये. तर, Jeep Compassची जून महिन्यात 791 युनिट्सची विक्री झाली होती. पण जुलै महिन्यात 509 युनिट्सची विक्री झाली. परिणामी, हेक्टरच्या तुलनेत इतर SUV गाड्यांची मागणी कमी झाल्याचं स्पष्ट आहे. cardekho ने याबाबतची आकडेवारी दिली आहे.

कशी आहे Hector SUV वाचा सर्व डिटेल्स –
प्रसिद्ध ब्रिटिश कार निर्माता कंपनी एमजी मोटर्स (मॉरिस गॅरेज)ची Hector SUV ही भारतातील पहिलीच कार आहे. ही भारतातील पहिली 50 हून जास्त कनेक्टेड फीचर्स असलेली इंटरनेट कार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. सध्याचा काळ वायरलेस कनेक्टीविटीचा आहे. मोबाइल, स्मार्टवॉचद्वारे इंटरनेटचा वापर आपण करतच असतो, तर अ‍ॅमेझॉन एको, गुगल होम यांसारख्या उपकरणांना केवळ बोलून आदेश (व्हॉइस कमांड) देऊन अनेक कामे करू शकतो. याच तंत्रज्ञानाचा वापर भारतात पदार्पण करू पाहणाऱ्या ‘एमजी मोटर’च्या हेक्टर या एसयूव्हीत करण्यात आला आहे. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेली Hector SUV ही कंपनीची भारतातील पहिलीच कार आहे. याशिवाय ही भारतातील पहिली 50 हून जास्त कनेक्टेड फीचर्स असलेली इंटरनेट कार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या एसयूव्हीत देण्यात आलेल्या काही सुविधा या श्रेणीत प्रथमच देण्यात आल्या असून भारताच्या एसयूव्ही बाजारात हेक्टर एक दमदार दावेदार ठरणार आहे. केवळ एसयूव्ही बाजारात स्वत:चे स्थान तयार करणेच नाही तर एमजीसाठी भारतातील वाट सुकर करण्याची मोठी जबाबदारी हेक्टरवर आहे. हेक्टरच्या यशाचा परिणाम एमजी मोटर्सच्या भारतात येणाऱ्या गाडय़ांवर होणार आहे.

इंटरनेट कनेक्टीविटी हे या गाडीचे वैशिष्ट आहे. हेक्टरमध्ये आयस्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. गाडीतील 10.4 टचस्क्रिन ही सुरक्षित, कनेक्टेड प्रवासाची खात्री करण्यासाठी तयार आहे. भारतीय बाजारात पदार्पणाबाबत एमजी मोटार्स अत्यंत गंभीर असून भारतीय रस्ते, हवामान आणि भारतीय चालकांना अनुरूप हेक्टरमध्ये मोठय़ा प्रमाणात बदल करण्यात आले आहे.

हेक्टर आकाराने मोठी असून इतर एसयूव्हीच्या तुलनेत स्वत:चे वेगळे अस्तित्व दाखवते. हेक्टर 4655 एमएम लांब असून, रुंदी 1835 एमएम आणि उंची 1760 एमएम आहे. हेक्टर ही उंची, रुंदीने बाजारातील या श्रेणीतील इतर एसयूव्हीच्या तुलनेने मोठी आहे. त्याचप्रमाणे हेक्टरचा व्हिलबेस देखील जास्त आहे. आकाराने मोठय़ा असलेल्या या गाडीची चाक 17 इंचांची आहेत. गाडीचे डिजाइन पाहता हेड लाइटची रचना टाटाच्या हॅरियरप्रमाणे आहे. गाडीत डायन्यामिक टर्न इंडिकेटर्स आहेत. पांढऱ्या एलईडी क्वाड प्रोजेक्टर हेडलाइट देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे फॉग लाइट म्हणून एलईडी देण्यात आले आहेत.

गाडीचे केबिन मोठे आणि आरामदायी आहे. मागे बसणाऱ्या प्रवाशांसाठी पाय ठेवायला पुरेशी जागा देण्यात आली आहे. पुढची सीट गुडघ्याला लागत नसल्याने तीन जण व्यवस्थितरीत्या मागच्या सीटवर बसू शकतात. गाडीचे फ्लोअर सपाट असल्याने मध्ये बसणाऱ्या व्यक्तीला पाय ठेवण्यासाठी कोणतीच अडचण येत नाही.

गाडीच्या पुढच्या बाजूला डॅशबोर्ड आणि डोअर पॅडवर चांगल्या प्रतीच्या प्लास्टिकचा वापर करण्यात आला आहे. डॅशबोर्डवर , इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये लेदरचा वापर करण्यात आला आहे. गाडीच्या केबिनला प्रीमियम दर्जाच्या गाडीसारखे बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गाडीमध्ये अनेक अत्याधुनिक सोयी देण्यात आल्या आहेत. फ्रंट आणि रिअर पार्किंग कॅमेरे, ३६० अंशात चित्रीकरणाची क्षमता असणारा कॅमेरा देण्यात आला आहे. ७ इंचाचा ड्राइवर डिस्प्ले देण्यात आला असून एम्बिएन्ट लाइट दिली आहे. मोठा सनरूफ या गाडीच्या वैशिष्टय़ांमध्ये भर घालतो. हेक्टर पेट्रोल आवृत्तीला 1.5 लिटर टर्बो-चार्ज पेट्रोल इंजिनची देण्यात आले आहे. ज्यात 250 एनएमच्या पीक टॉर्कवर 143 पीएस शक्ती उत्पन्न करण्याची क्षमता आहे. हे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रांसमिशन अशा दोन्ही स्वरूपात कार्यरत होईल. याचे 2.0 लिटर डिझेल इंजिन 350 एनएमच्या पीक टॉर्कवर 170 पीएस प्रदान करेल व सोबतच श्रेणीमधील सर्वोत्तम इंधन कार्यक्षमताही प्रदान करेल, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. 48 व्होल्ट लिथियम-या गाडीत ‘48 व्ही’ हायब्रीड प्रणाली वापरली आहे . उत्सर्जन कमी करण्यासोबतच इंधन-कार्यक्षमता वाढण्यासाठी बनवलेले हे युनिट 20 एनएमपर्यंत अतिरिक्त टॉर्क सहाय्य प्रदान करण्यास ऊर्जेचा संग्रह करते, असा दावा कंपीने केला आहे. 6-स्पीड डीसीटी- डीसीटी हे अतिशय प्रतिष्ठित व परिष्कृत ऑटोमॅटिक ट्रांसमिशन आहे. इतर प्रकारांप्रमाणेच, डीसीटीलाही जागतिक स्तरावर खडतर पर्यावरणाच्या परिस्थितींमध्ये 2.6 दशलक्ष किलोमीटरपेक्षा जास्त तपासण्यात आले असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

सुरक्षा –

गाडीत सुरक्षेसाठी दोन ऐअरबॅग, एबीएस, इबीडी, लहान बाळाची सीट ठेवण्यासाठी सुविधा, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रॅम, ट्रक्शन कंट्रोल या सुविधा आहेत. गाडीच्या सर्व पर्यायांमध्ये या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गाडीच्या महागडय़ा पर्यायांमध्ये कर्टन ऐअरबॅगसह सहा ऐअरबॅग देण्यात आल्या आहेत. टायरमधील हवेचा दाब पाहण्यासाठी टायर प्रेशर मॉनिटर देण्यात आला आहे. थंडी आणि दमट हवामानाचा परिणाम होऊ नये यासाठी हिटेड विंग प्रणालीचे आरसे देण्यात आले आहेत.

आय स्मार्ट यंत्रणा –

हेक्टरमध्ये 10.4 इंचांची टचस्क्रीन देण्यात आली आहे. ही टचस्क्रीन गाडीच्या कमांड सेंटरप्रमाणे काम करते. या टचस्क्रीनद्वारे तुम्ही गाडी नियंत्रित करू शकता. या गाडीत बोलून आदेश समजून घेण्याची यंत्रणा देण्यात आली आहे. ‘हॅलो एमजी’ म्हटल्यावर ही यंत्रणा कार्यरत होते. याद्वारे गाडीची वातानुकूलन यंत्रणा, संगीत प्रणाली नियंत्रित करता येऊ शकते. गाडीचे सनरूफदेखील बोलून आदेश देऊन नियंत्रित करता येते. गाडीला कनेक्टेड कार म्हटले असून गाडीची वातानुकूलन यंत्रणा आणि गाडीचे बूट तुम्ही घरी बसल्या नियंत्रित करू शकता. या अत्याधुनिक सुविधांमुळे ग्राहकांना वाहन चालवण्याचा एक वेगळा अनुभव देण्याच्या एमजीचा प्रयत्न आहे.

एमजी मोटर्स इंडियाविषयी –

1924 मध्ये युके येथे संस्थापित ‘मॉरिस गॅरेजेस व्हेइकल्स’ त्यांच्या स्पोर्ट्स कार, रोडस्टर्स आणि कॅब्रिओलेट श्रृंखलेसाठी जगप्रसिद्ध आहेत. आपल्या शैली, अभिजातता आणि भन्नाट कार्यप्रदर्शनासाठी एमजी व्हेईकल्सचे बरेच लोकप्रिय व्यक्ती चाहते आहेत, ज्यामध्ये ब्रिटिश पंतप्रधान आणि इतकेच नव्हे तर ब्रिटिश राजघराणेसुद्धा सामिल आहेत. 1930 मध्ये अबिंग्डन युके येथे स्थापित एमजी कार क्लब हा मागील 95 वर्षांमध्ये एका आधुनिक, आणि अभिनव ब्रांडमध्ये विकसित झाला आहे. भारतीय बाजारात लवकरच आपली वाहने सादर करण्याच्या योजनेसह एमजी मोटर इंडियाने हलोल गुजरात येथील आपल्या उत्पादन सयंत्रामध्ये उत्पादन कार्य सुरू केले आहे.

किंमत –
12.18 लाख ते 16.88 लाख रुपयांदरम्यान (एक्स-शोरुम) हेक्टरच्या विविध व्हेरिअंट्सची किंमत आहे.

First Published on August 13, 2019 11:05 am

Web Title: july 2019 sales mg hector beats harrier compass xuv500 sas 89