आरोग्याला हानिकारक असल्याने ‘सीबीएसई’चा निर्णय
शाळा परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास सक्त मनाई आहे. कारण ते आरोग्यास हानिकारक असतात. याच धर्तीवर द सेंन्ट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (सीबीएसई) त्यांच्या शाळांच्या २०० मीटर परिघात जंक फूड मिळणार नाही याची खबरदारी घेतली आहे.
या शाळांच्या उपाहारगृहांमध्येही जंक फूड उपलब्ध होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन या मंडळाने त्यांच्या शाळांना दिले आहेत. सीबीएसईकडून याविषयीच्या सूचनेचे परिपत्रक संबंधित शाळांना पाठविले आहे. वेफर, बर्गर, कॉबरेनेटयुक्त शीतपेय, नूडल्स, पिझ्झा आदी पदार्थ हानिकारक असल्याने विद्यार्थ्यांनी ते खाऊ नये, असे या परिपत्रकात म्हटले आहे. या पदार्थामध्ये कॅलरी, मीठ आणि साखर (एचएफसीसी) यांचे प्रमाण जास्त असल्याने टाइप टू-मधुमेह, उच्च रक्तदाब आणि अन्य विकार बळावण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. यासाठी महिला आणि बालकल्याण खात्याने दिलेल्या अहवालाचा दाखला देताना सीबीएसईचे सचिव जोसेफ इम्यॅन्युएल यांनी सांगितले की, शाळेच्या आवारात आणि सभोवताली उपलब्ध होणाऱ्या जंक फूडमुळे बळावणाऱ्या आजारांवर कशा प्रकारे नियंत्रण मिळवणे शक्य होईल, याची पाहणी करण्यात येत आहे.
अहवालातील शिफारशी
* सीबीएसई शाळांच्या उपाहारगृहामध्ये वेफर, तळलेले पदार्थ, कॉबरेनेटयुक्त शीतपेय, न्यूडल्स, पिझ्झा, बर्गर, बटाटय़ाचे तळलेले पदार्थ, चॉकलेट, कॅण्डी, समोसा आदी पदार्थ उपलब्ध नसतील याविषयीची खात्री करा.
* शाळांनी यासाठी ‘शाळा उपाहारगृह व्यवस्थापन समिती’ निर्माण करावी. त्यात शाळेमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि उपाहारगृह व्यवस्थापक मिळून ७ ते १० जणांचा समावेश असावा.
* या समितीला शाळेतील मुलांना दिल्या जाणाऱ्या अन्नाची पाहणी आणि मार्गदर्शक तत्त्वे ठरविण्याचा अधिकारही देण्यात आला आहे.
* १ ते ७ सप्टेंबरदरम्यान ‘पौष्टिक आहार सप्ताह’ साजरा करताना मुलांना पौष्टिक आहाराविषयीचे मार्गदर्शन आणि हानिकारक पदार्थाच्या दुष्परिणामांबाबत जागृती करावी.
* मुलांची उंची, वजन आणि सामूहिक शारीरिक तपासणीची नोंद घेताना त्यानुसार आवश्यक आहाराबाबत पालक-शिक्षकांच्या बैठकीदरम्यान विश्लेषण करावे.