तुषार कुटे – response.lokprabha@expressindia.com

डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या जुन्नर परिसरात जेवढी गडकोटांची संख्या जास्त आहे, तेवढीच धरणांचीही. कुकडी, मीना, मांडवी आणि पुष्पावती या नद्या जुन्नर आणि परिसरातून वाहतात. यापैकी कुकडी नदीवर दोन – येडगांव आणि माणिकडोह तर मीना नदीवर वडज, मांडवीवर चिल्हेवाडी आणि पुष्पावतीवर पिंपळगाव जोगे धरण बांधलेले आहे. कुकडी आणि पुष्पवती संगमस्थान असणारे येडगाव धरण सोडले तर इतर धरणे ही डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या भागात बांधलेली आहेत. त्यामुळे ती नसिर्गातील सौंदर्यस्थळे असल्याची दिसतात.

चिल्हेवाडी धरण हे या पाचही धरणांपैकी सर्वात छोटे, परंतु सर्वात आकर्षक धरण होय. पुणे जिल्ह्य़ाच्या अतिउत्तरेला नगर जिल्ह्य़ाला लागून हे धरण बांधण्यात आले आहे. त्याचे वैशिष्टय़ म्हणजे नैसर्गिक दऱ्यांचा आणि कडय़ांचा वापर या धरण बांधणीत करण्यात आलाय. सर्वसाधारणपणे धरण म्हणजे सपाट भूपृष्ठावरून येणारे पाणी खोल जमिनीवर साठवण्याची रचना मानली जाते. काही धरणे मात्र या संकल्पनेला छेद देतात. त्यापैकीच एक धरण म्हणजे चिल्हेवाडी धरण होय. कातळकडय़ांनी बनलेल्या दऱ्यांनी घेरलेल्या भागात चिल्हेवाडी धरण आहे. त्यामुळे त्याची रचना पाहिली की, निसर्ग अभियांत्रिकीचा एक वेगळा आविष्कार पाहायला मिळतो. असे वाटते, की निसर्गाने वाहत्या पाण्याला या दऱ्याखोऱ्यांच्या परिसरात स्वत:मध्ये साठवून ठेवलेय. पर्यटनापासून कोसो दूर असलेला हा परिसर अतिशय शांत आणि निवांत असा आहे. धरण हे पर्यटनाचे ठिकाण असू शकते का, याचे उत्तर चिल्हेवाडीच्या या रमणीय परिसराला पाहून मिळते.

Marathi paper viral
यवतमाळ : पाटणबोरीत मराठीचा पेपर भ्रमणध्वनीवरून सार्वत्रिक
Water Storage, Amravati Division, Dams, Drops, 51 percent, Adequate Rainfall,
चिंता वाढली; अमरावती विभागातील धरणांमध्‍ये ५१ टक्‍के पाणीसाठा
Demand march regarding road in Kolhapur
चांगले रस्ते वा हाडांचे दवाखाने द्या; कोल्हापुरात अनोख्या मागणीचा मोर्चा
Unseasonal rain Washim
वाशिममध्ये अवकाळी पाऊस, गारपीट; हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने बळीराजा हवालदिल

चिल्हेवाडी धरणाकडे जाण्यासाठी जवळचे सर्वात मोठे गांव आहे, ओतूर. नारायणगांव आगाराच्या एसटी बसेस ओतुर येथून थेट चिल्हेवाडीला जाण्यासाठी नियमित अंतराने मिळू शकतात. परंतु या रस्त्याने थेट धरणाच्या बंधाऱ्यावर जाता येते त्यामळे धरणाची संपूर्ण रचना नीट ध्यानात येत नाही. डोंगर टेकडीवरून अर्थात वरच्या बाजूने धरण पाहायचे असल्यास थेट मांदारणे गांव गाठावे लागेल. ओतुरहून माळशेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन – तीन किमीवर उदापूर हे गांव आहे. तेथून उजवीकडचा रस्ता मांदारणे घाटातून जातो. या मार्गाने जाण्याकरिता ओतुरहून कोपरे – मांडवे ही बस पकडावी आणि मांदारणे घाट उतरल्यावर मांदारणे या गावी उतरावे. इथला पूर्ण परिसर हा डोंगराळ आहे. मांदारणे गावातून उजव्या बाजूचा एक कच्चा रस्ता चिल्हेवाडी धरणाकडे जातो. हा रस्ता दोन ते तीन किलोमीरचा आहे. स्वत:ची दुचाकी असल्यास तो पार करणे सोपे जाते. या रस्त्याने आपण पुढे जातो तसतसा दरीचा अंदाज येत जातो. या रस्त्याने शेवटच्या टोकावरील एका टेकडीवर शेतातून मार्गक्रमण करत गेल्यावर चिल्हेवाडी धरणाचे नयनरम्य दृश्य दिसते. चहू बाजूंनी कडे असल्याने पाणी अत्यंत सिथर दिसून येते. त्यामुळे पाण्यातील जलचरांनी थोडी जरी हालचाल केली तरी ती या शांत पाण्यात मनोवेधक असते.

चिल्हेवाडी धरणाच्या कडय़ांवर तशी मनुष्यवस्ती तुरळकच आहे. परंतु धरणाच्या दरीतील कडय़ापर्यंत शेतीची समृद्धी दिसून येते. मांडवे येथे उगम पावणारी मांडवी नदीचा प्रवाह वरच्या बाजूने खळाळत कोसळताना दिसतो. अगदी एक किमीवरूनदेखील त्याचा आवाज स्पष्ट ऐकू येतो. धरणाची खोली पाहण्यासाठी डोंगर उतरून खाली जाता येते. इथल्या स्थिर आणि निळ्याशार पाण्यात आकाशाचे हुबेहुब प्रतिबिंब पडल्याचे दिसते. धरणाच्या पाण्याला मात्र प्रत्यक्ष स्पर्श करणे, खूपच अवघड आहे. कठडय़ांवरील गवतांत चरणाऱ्या शूर जनावरांचे मात्र कौतुक वाटते.

पावसाळ्यात चिल्हेवाडीचा परिसर धुक्यातच राहतो. परंतु धरणात कोसळणारे नयनरम्य धबधबे पाहता येतात. हिवाळा आणि उन्हाळ्यातील स्वच्छ वातावरणात धरणाचा निसर्गरम्य परिसर उंच ठिकाणी ऐटीत बसून न्याहाळता येतो. निसर्ग कवींना चिल्हेवाडी धरण परिसर म्हणजे एक पर्वणीच आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. शहराच्या गोंगाटापासून आणि वाहनांच्या धुरापासून दूर असलेला हा परिसर एकदा तरी पहायलाच हवा.
सौजन्य – लोकप्रभा