२१ व्या शतकात पुरुषांसोबत स्त्रियादेखील प्रत्येक क्षेत्रात खंबीरपणे कार्यरत आहेत. स्त्रिया विविध स्तरातून मेहनतीनं स्वतःची जागा निर्माण करतात. यामुळेच की काय स्त्रियांना आपण आदिशक्तीचे रूप मानतो. स्त्रिया प्रत्येक प्रवासात स्वतःसोबत आपल्या कुटुंबाचादेखील विकास आणि सांभाळ करीत असतात. अनेक अडचणी, खाच खळगे पार करीत आपल्या आयुष्यातल्या एका महत्वाच्या टप्प्यापर्यंत पोहोचतात, मात्र इथे प्रवास संपत नाही तर खरा प्रवास इथून सुरु होतो, तो सर्व स्त्रियांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट असतो. अशाच एका कलात्मक स्त्रीने आपल्या आयुष्यातले टर्निंग पॉईंट पार करत अनेक स्त्रियांसाठी आदर्श निर्माण केला आहे. अभुदय नगर मधील कामगार कल्याण येथे लहानीची मोठी झालेल्या कल्पिता राणेने व्हिएतनाम इथे पार पडलेल्या विश्वविजेती या स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधीत्व केले.

विचारांमध्ये सुंदरता असणं म्हणजेच खरं सौंदर्य असे मानणाऱ्या कल्पिताने वयाच्या १० व्या वर्षी झाशीची राणी या मालिकेतून आपल्या करिअरची सुरवात केली. या मालिकेत तिने झाशीच्या राणीच्या बालपणाची भूमिका साकारली होती. कल्पिताने भरतनाटयम या नृत्यकलेचं शात्रोक्त शिक्षण घेतलं आहे. स्वतःला नृत्यकलेच्या शिक्षणासाठी करावी लागलेली पायपीट अभुद्य नगरच्या येणाऱ्या पिढीला करावी लागू नये, यासाठी तिने वयाच्या १५ व्या वर्षी आई-वडिलांच्या सहाय्याने कल्पांगण या संस्थेची निर्मिती केली. गेली १५ वर्षे ही संस्था अभुद्य नगर येथील अनेक नविन पिढ्यांना घडवत आहे. आज कल्पांगणच्या माध्यमातून ८२ मुलींना नाट्य, संगीत, तबला याचे प्रशिक्षण मिळते आहे. लग्नानंतरही कल्पिताने कल्पांगणच्या मुलींना घडवण्याचे कार्य चालू ठेवले आहे.

सुलभाताई देशपांडे यांच्या अविष्कार शाळा या संस्थेतर्फे ‘दुर्गा झाली गौरी’ या नृत्यनाटिकेतून कल्पिताने काम केले होते. कल्पिता आणि कलेचा संगम तिच्या शालेय जीवनापासूनच सुरु झालेला होता, मात्र यामध्ये सात्यत्य टिकवून ठेवण्याची जबाबदारी कल्पिताने व्यवस्थितरित्या पार पडली. लग्नानंतर ती थांबली नाही, लग्नानंतरही कल्पिताने अभ्युदय नगरच्या विवाहीत महिलांसाठी नृत्याचे शिक्षण देण्यास सुरु ठेवले. स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी कल्पिताने आजवर अनेक उपक्रम राबवले आहेत. गेल्याच वर्षी कल्पिताने मिसेस इंडिया वर्ल्ड वाईड या सौंदर्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेमध्ये अंतिम ५० जणींमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबातील कल्पिताने बाजी मारली. व्हिएतनाम येथे पार पडलेल्या स्पर्धेमध्ये त्यांना ‘मिसेस टॅलेंटेड’ हा किताब मिळवला. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात मिस ते मिसेस हा प्रवास सगळ्यात कठीण असतो. प्रत्येक स्त्री हा प्रवास अनुभवत असते.

या प्रवासाविषयी सांगितले कल्पिता म्हणाली की, ‘मीसुद्धा मिस ते मिस ते मिसेस या प्रवासाचा अनुभव घेतला आहे. आपल्या करिअरविषयीची माहिती पटवून देताना तुम्ही स्टेबल असणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीला समजून घेण्यासाठी किंवा समजावून देण्यासाठी योग्य वेळ दिला की प्रवास आणखी सोपा होतो. असाच प्रवास करत मी मिसेस इंडिया वर्ल्ड वाईड या स्पर्धेपर्यंत पोहोचले.’ कल्पिता राणेचा हा प्रवास अनेक स्त्रियांसाठी एक आदर्श आहे. प्रत्येक स्त्रीने तिच्या कठीण काळात ठामपणे उभे राहून येणाऱ्या प्रसंगाला धीटपणे सामोरे जाण्याचा, सल्ला कल्पिता देतात.