अभिनेत्री कंगना राणावत हिला ट्विटरने आपल्या व्यासपीठावरून कायमस्वरूपी हद्दपार केल्याने सध्या समाजमाध्यमांवर उलटसुलट चर्चा सुरू आहे. हा अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला असल्याची ओरड एकीकडे होत असताना या स्वातंत्र्याचा गैरवापर करून समाजात दुही पसरवू पाहणाऱ्यांवर कारवाई योग्यच, अशी मतेही व्यक्त होत आहेत. पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालांनंतर राज्यात झालेल्या हिंसाचाराबाबत ट्विटरवरून प्रतिक्रिया व्यक्त करताना कंगनाने हिंसाचाराला खतपाणी घालणारे वक्तव्य केल्याप्रकरणी तिचे ट्विटर खाते कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय ट्विटरने जाहीर केला.

ट्विटरवरून आक्षेपार्ह किंवा प्रक्षोभक वक्तव्ये केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आलेली कंगना ही पहिली ‘सेलिब्रिटी’ नाही. कंगनाने याआधी अनेकदा ट्विटरच्या व्यासपीठावरून एका विशिष्ट समाजाबाबत अपशब्द वापरल्याचे किंवा अन्य वापरकर्त्यांवर अर्वाच्य शब्दांत भाष्य केल्याचे प्रकार घडले आहेत. त्या वेळीही कंगनावर बंदी घालण्याबाबत तक्रारी आल्या होत्या. मात्र ट्विटरने तेव्हा कारवाईचा हात आखडता घेतला होता. मग आताच ट्विटरने हा निर्णय का घेतला?

‘समाजासाठी हानीकारक ठरेल, अशा प्रकारच्या वर्तणुकीवर कडक कारवाई करण्याची आमची भूमिका स्पष्ट आहे. संबंधित (कंगना राणावत) खाते ट्विटरच्या नियमांच्या वारंवार उल्लंघनप्रकरणी कायमस्वरूपी हटवण्यात येत आहे,’ असे ट्विटरने त्या वेळी स्पष्ट केले. मात्र याबाबतचा निर्णय एका झटक्यात घेतला जात नाही. त्यासाठी ट्विटरची स्वतंत्र अशी प्रक्रिया आहे.

कारवाईची प्रक्रिया कशी?

अमेरिकेतील कॅपिटॉल इमारतीत घुसखोरी आणि दंगल झाल्यानंतर दंगलखोरांना चिथावणी दिल्याबद्दल अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ट्विटरने कायमस्वरूपी बंदी आणली होती. त्या वेळीही समाजमाध्यमांवरील अभिव्यक्तिस्वातंत्र्याबाबतचा मुद्दा चर्चिला गेला होता. ट्विटरच्या धोरणानुसार एखाद्या वापरकर्त्यांचे ‘कायमस्वरूपी निलंबन’ म्हणजे ‘सर्वात कडक कारवाई’ आहे. या कारवाईअंतर्गत संबंधित खाते त्यानंतर कुणालाही नजरेस पडत नाहीच, पण त्या व्यक्तीला नवीन खाते उघडताही येत नाही. याचाच अर्थ आता कंगना राणावतला कोणत्याही प्रकारे पुन्हा ट्विटरवर येता येणार नाही.

ट्विटरचे धोरण काय?

ट्विटर कोणत्याही प्रकारे वापरकर्त्यांच्या ट्वीटची तात्काळ पडताळणी करत नाही वा असा एखादा मजकूर आल्यास तो स्वत:हून हटवतही नाही. दोन भिन्न मतांच्या वापरकर्त्यांमध्ये शाब्दिक संघर्ष सुरू असला तरीही त्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न ट्विटर करत नाही. मात्र एखाद्याला लक्ष्य करून केलेली शिवीगाळ किंवा शोषण या कृती ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन करतात, असे कंपनीचे धोरण आहे.

कंगना कारवाईला आव्हान देऊ शकते?

कायमस्वरूपी निलंबनाच्या निर्णयाला संबंधित सभासद आव्हान देऊ शकतो. त्यासाठी ट्विटरच्या प्लॅटफॉर्मवर स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. या माध्यमातून कंगना बंदीच्या निर्णयाविरोधात तक्रार करू शकते. एक स्वतंत्र यंत्रणा या तक्रारीचा आढावा घेऊन त्याबद्दल निर्णय देते.

अन्य कारवाई काय?

समाजात द्वेष पसरवणाऱ्या किंवा तेढ निर्माण करणाऱ्यांवर ट्विटर वेगवेगळ्या पद्धतीने कारवाई करू शकते. अशा व्यक्तींचे खाते केवळ ‘रीड ओन्ली’ केले जाते. त्यामुळे त्यावरील मजकूर अन्य कुणालाही प्रसारित करता येत नाही. ट्विटर त्यांची ट्वीटमर्यादा कमी करू शकते. त्याचप्रमाणे कायमस्वरूपी निलंबनाच्याही आधी एखाद्या व्यक्तीवर १२ तास ते सात दिवसांपर्यंतच्या हंगामी बंदीचीही कारवाई करण्यात येते.

वापरकर्त्यांना सूचना

* ट्विटरवरून होणाऱ्या संभाषणांमध्ये अनेकदा अपशब्द किंवा हिणवणारी विधाने असतात. अशा वेळी संबंधित संभाषण किंवा ट्वीट आक्षेपार्ह ठरवले जाऊ शकते. मात्र याबाबत तक्रारी करण्यापूर्वी वापरकर्त्यांनी काही गोष्टी पडताळून पाहाव्यात, असे ट्विटरचे म्हणणे आहे.

* आशय समजून घ्या : ट्विटरवरून सुरू असलेल्या कोणत्याही चर्चेत वापरकर्ते सहभागी होऊन आपली मते नोंदवू शकतात. अशा वेळी मतमतांतरे स्वाभाविक आहेत. त्याचबरोबर अशी एखादी चर्चा दीर्घकाळ सुरू राहण्याची किंवा भरकटण्याचीही शक्यता असते. त्यामुळे वापरकर्त्यांनी चर्चेचा आशय समजून घेतला पाहिजे. तुम्हाला एखादे ट्वीट आक्षेपार्ह दिसले की सर्वप्रथम त्याच्याशी संबंधित व्यापक संभाषण तपासून पाहा. अनेकदा आपले म्हणणे कमी शब्दांत मांडण्याच्या प्रयत्नात वापरकर्त्यांच्या विधानाचा वेगळा अर्थ निघू शकतो. अशा वेळी संबंधित व्यक्तीला थेट मेसेज (डायरेक्ट मेसेज) पाठवून त्याचे लक्ष वेधून घेता येईल.

*  ट्वीट करण्यापूर्वी विचार करा : सकारात्मक संवादाची जबाबदारी सर्वाची असते. तुमचे एखादे ट्वीट आक्षेपार्ह भाषेतील किंवा अपायकारक असेल तर ट्विटरकडून त्याबद्दल सुरुवातीलाच विचारणा होते. अशा वेळी ट्वीट करणाऱ्याला आपल्या वक्तव्याबाबत पुनर्विचार करण्याची संधी मिळते. त्यातून त्याला आपली चूक उमगल्यास पुढील संघर्षमय परिस्थिती टाळता येते.

टाळणे हा उत्तम पर्याय

आशय समजून घेतल्यास अनेकदा नकारात्मक संभाषण टाळता येते. मात्र तरीही एखादी व्यक्ती सातत्याने तुम्हाला लक्ष्य करत असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला ‘ब्लॉक’ करू शकता किंवा ‘अनफॉलो’ही करू शकता.