18 September 2020

News Flash

दिवाळीची साफसफाई करताना ‘हे’ लक्षात ठेवा

दिवाळीला काही दिवस बाकी असताना घरातील सर्व मंडळी एकत्र येत साफसफाई करतात, यावेळी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

दिवाळी हा महाराष्ट्रातील एक मोठा सण. थंडीची चाहूल घेऊन येणाऱ्या या सणात दिव्यांना विशेष महत्त्व असते. दिव्यांनी घर उजळून टाकताना आपले मनही त्याप्रमाणे उजळून निघावे अशी यामागची संकल्पना असते. दिवाळीमध्ये फराळाचे पदार्थ, खरेदी यांबरोबरच आणखी एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे घराची साफसफाई. दिवाळीला काही दिवस बाकी असताना घरातील सर्व मंडळी एकत्र येत ही साफसफाई करतात. घराचे सौंदर्य खुलण्यास यामुळे निश्चितच मदत होते. आता ही साफसफाई आपण दरवर्षी करत असलो तरीही काही सोप्या गोष्टी लक्षात घेतल्यास हे काम सोपे होण्यास मदत होते. पाहूयात दिवाळीच्या साफसफाईच्यादृष्टीने अशाच काही महत्त्वाच्या टीप्स…

१. घरातील न लागणाऱ्या वस्तू माळ्यावर साठवून न ठेवता लागत नसतील तर त्या टाकून द्या.

२. जुने कपडे, चपला, भांडी यांसारख्या वापरात नसलेल्या परंतु चांगल्या असलेल्या वस्तू एखाद्या सामाजिक संस्थेला किंवा गरीबांना द्या. आपल्याला त्याचा उपयोग नसेल तरी या लोकांना त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो.

३. घरातील कपाटामागील किंवा इतर वस्तूंमागील धूळ आधी झाडूने साफ करा. मगच ओल्या फडक्याने पुसून घ्या. कोरड्याने धूळ साफ केल्यामुळे पाण्याने साफ करताना जास्त खराब होत नाही.

४. ज्यांना धुळीचा त्रास होतो त्यांनी नाकाला रुमाल बांधून मगच साफसफाईचे काम करण्यास सुरुवात करा. अन्यथा धुळीची अॅलर्जी असल्यास श्वसनाचे त्रास होण्याची शक्यता असते.

५. घरातील पडदे जास्त वेळा धुतले जात नाहीत. मात्र दिवाळीच्या वेळी हे धुवायला काढताना जास्त काळ साबणाच्या पाण्यात भिजवून ठेवावेत. त्यामुळे त्यामधील मळ लवकर सुटून येण्यास मदत होते.

६. स्वयंपाकघर किंवा बाथरुममधल्या टाइल्स साफ करताना चांगल्या दर्जाच्या फिनाईलचा वापर करावा. त्यामुळे या टाइल्स चमकण्यास मदत होते.

७. स्टूल किंवा शिडी यावर चढून साफसफाई करत असताना योग्य ती काळजी घ्यावी अन्यथा अपघात घडण्याची शक्यता असते.

८. घरातील सर्व व्यक्तींनी साफसफाईच्या कामात सहभाग घ्यावा. अन्यथा घरातील स्त्री एकटीच ही कामे करताना दमून जाते. घरातील लहान मुलांनाही त्यांना शक्य त्या प्रकारची कामे सांगावीत. जेणेकरुन त्यांनाही लहानपणापासूनच साफसफाई करण्याची सवय लागते.

९. घरातील लोकांना ऑफीस आणि इतर व्यापामुळे साफसफाई करणे शक्य नसल्यास बाहेरच्या लोकांकडून साफसफाई करुन घेण्यात येते. मात्र बाहेरुन लोकांना बोलावताना ती आपल्या किमान ओळखीची असतील याची काळजी घ्यायला हवी. घरातील किमती चीजवस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवायला हव्यात.

१०. स्वयंपाकघरातील सिंक किंवा यासारखी एखादी बंद जागा असेल तर त्याठिकाणी कुबटपणा राहण्याची शक्यता असते. अशावेळी तिथे डांबरगोळ्या किंवा कापूर ठेवावा. त्यामुळे कुबटपणा निघून जाण्यास मदत होतेच पण किडे, मुंग्या, झुरळे यांचा प्रादुर्भाव होत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 11:35 am

Web Title: keep these things in mind while cleaning your home for diwali easy tips
Next Stories
1 पर्सनल लोन घेताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
2 फराळाच्या पदार्थांसाठी वृत्तपत्राचा वापर करु नका, कारण…
3 मॅरेथॉनमध्ये सहभागी होताय? हे वाचाच…
Just Now!
X