सध्या आपल्याकडे लग्नाचा हंगाम सुरू आहे. मोठे रिसेप्शन असो किंवा डेस्टिनेशन वेडिंगसारखी नवीन टूम, हे सर्व फार खर्चिक असते. अशा खर्चाचा विचार लग्न ठरल्यापासूनच करायला हवा. अशा प्रसंगांसाठी फार आधीपासून तयार करावी लागते, हे वेगळे सांगायला नको. तरीही, अजून जर तुम्ही याची तयारी केलेली नसेल, तर तुमच्या कल्पनेतला ‘आदर्श लग्न-सोहळा’ साजरा करण्यासाठी अनेक पर्याय हाताशी आहेत. असाच एक पर्याय म्हणजे पर्सनल लोन (वैयक्तिक कर्ज) होय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पर्सनल लोन म्हणजे काय?

हे बहु-उद्देशीय कर्ज असते जे कुठल्याही खासगी किंवा व्यावसायिक उद्दिष्टांसाठी वापरता येते. यासाठी कुठल्याही प्रकारचे जामीन किंवा जामीनदार लागत नाही. त्यामुळे हे कर्ज सहज उपलब्ध असते.

याचा फायदा काय?

जामिनाशिवाय असल्या कारणाने हे लोन तुमच्या स्वप्नवत लग्नसोहळ्यासाठी उपयोगी पडू शकतो. तुम्ही या पैशाचा उपयोग हवा तसा करू शकता आणि याची परतफेड कमाल ५ वर्षांत केली जाऊ शकते. हे कर्ज सहज मिळते आणि यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची मालमत्ता जामीन ठेवावी लागत नाही. यामुळे पर्सनल लोन अशा लोकांसाठी फार उपयोगी असते ज्यांच्याकडे जामीन ठेवण्यासाठी कुठल्याही प्रकारची मालमत्ता नाही.

पर्सनल लोन घेताना हे लक्षात ठेवा

व्याजाचा दर

पर्सनल लोन जामीन ठेवल्याशिवाय देण्यात येत असल्यामुळे हे सर्वात महाग कर्ज असते. व्याजाचा दर साधारण १० टक्क्यांपासून सुरू होतो आणि १४ टक्क्यांपर्यंत असू शकतो. असे महागड़े कर्ज घेताना सावध राहणे गरजेचे आहे कारण व्याजाचा फटका शेवटी तुमच्या खिशालाच बसणार आहे.

इएमआयचा आकडा

साधारणपणे पर्सनल लोनची परतफेड कमाल ५ वर्षांत करायची असते. तुम्ही तुमच्या सोयी प्रमाणे ५ वर्षांपर्यंत कुठलाही कालावधी निवडू शकता. हा कालावधी कर्जाचा आकडा आणि व्याजाचा दर आणि तुमचे उत्पन्न या तीन बाबी मिळून ठरवतात. तुम्ही तुमच्या लग्नासाठी कर्ज घेण्यास उत्सुक असलात, तरी इएमआय निवडताना सावध राहा. यासाठी नीट हिशेब करून हप्ता परवडण्यासारखा आहे ना याची खात्री करून मगच निर्णय घ्या.

कर्जाची रक्कम

लग्नाचा खर्च आपण कितीही वाढवू शकतो. तुम्ही वाटेल तेवढा पैसा त्यात ओतलात, तरीही काही खर्च राहूनच जातात. कर्ज मिळते आहे या कारणास्तव अवाढव्य खर्च करू नका. बजेट ठरवून घ्या आणि त्यातच लग्नाचा खर्च बसवा. कर्ज घ्या, पण रकमेवर लक्ष द्या. परतफेड करण्यास बाधा येईल व इएमआय खूप जास्त असेल असे न परवडणारे कर्ज घेऊ नका.

पर्सनल लोनचे इतर पर्याय

व्याजाचे दर लक्षात घेता पर्सनल लोन बरेच महाग असते. तुम्ही खर्च भागवण्यासाठी इतर कर्जांचाही विचार करू शकता. काही अशा मालमत्ता आहेत ज्यांना जामीन ठेवून तुम्ही खासगी किंवा व्यावसायिक खर्चासाठी कर्ज घेऊ शकता. तुम्ही या मालमत्तांवर कर्ज घेऊ शकता.

* ठराविक परतावा असलेली गुंतवणूक, जसे एनएससी, केव्हीपी, पीपीएफ इत्यादी.

* आयुर्विमा पॉलिसी

* शेअर्स

* म्युचूअल फंड्स, इत्यादी

अशी कर्जे तुमच्या गुंतवणुकीच्या रकमेवर आधारलेली असतात आणि त्यांना ती गुंतवणूक जामीन असते. त्यामुळे अशा कर्जांचा व्याजाचा दर पर्सनल लोनपेक्षा कमी असतो. भव्य-दिव्य लग्नसोहळ्याचे नियोजन करण्याआधी तुमचे बजेट समजून घ्या. अधिक व्याज दर आणि परवडणारा इएमआय यांचा विचार करूनच पर्सनल लोनबद्दल निर्णय घ्या. जर तुमच्या पुरेशा गुंतवणुकी असतील, तर त्यांना गहाण ठेऊन कर्ज घ्या कारण त्यांच्यावर कमी दराने व्याज द्यावे लागते.

आदिल शेट्टी,

सीईओ, बँकबझार

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Keep this things in mind before taking personal loan for marriage purpose
First published on: 20-11-2017 at 15:00 IST