येत्या काही तासात २०१८ वर्ष सुरू होईल. नवीन वर्षाच्या शुभेच्छांचा सर्व दिशांनी अगदी महापूर येईल. गेल्या वर्षातल्या चांगल्या वाईट घटनांची उजळणी होईल. आणि त्याचबरोबर नव्या वर्षात काय करायचे याच्या योजनासुद्धा मनात तरळू लागतील. आयुष्य सुखी व्हायला काय लागतं? पैसा? सामाजिक प्रतिष्ठा? प्रसिद्धी? एखाद्या भाग्यवंताला पैसा, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी मिळूनही आरोग्याने साथ दिली नाही, तर त्या गोष्टींचा आनंद उपभोगणे दुरापास्त होते. मात्र सर्वांगसुंदर आरोग्य प्राप्त झाले तर जीवन उजळून निघते आणि पैसा, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धीच्या साऱ्या सीमारेषा पुसून जाऊन आयुष्याच्या शेवटपर्यंत स्वास्थ्य लाभते. त्यामुळे येणारे वर्ष सुखासमाधानाने जावे यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. पाहूयात काय आहेत या गोष्टी…

१. नियमित व्यायाम-  दरवर्षी १ जानेवारीपासून सर्व व्यायामशाळा आणि हेल्थ क्लब तुडुंब भरतात. पण नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात होणारी गर्दी सात-आठ दिवसात बारगळते. मात्र असे होणार नाही यासाठी आपण विशेष प्रयत्न करुया. चालण्या-पळण्याच्या व्यायामांना जर व्यायामशाळेतील व्यायामांची, म्हणजे वजने उचलणे,जोर-बैठका, सूर्यनमस्कार यापैकी एकाची जोड देण्याचा पक्का निश्चय करू.

२.हेल्दी आहार- आजच्या धकाधकीच्या जीवनात आहाराच्या बाबतीत भुकेच्या वेळा पाळण्यापेक्षा, व्यवसाय-नोकरीच्या वेळा पाळून खाण्याकडे लोकांचा कल जास्त दिसतो. भूक लागली की खाण्यापेक्षा वेळ मिळेल तेव्हा खाणे आणि मिळेल ते खाणे असा ट्रेंड आहे. पण यावर्षी पालेभाज्या, कडधान्ये, प्रथिने यांनी सजलेला चौरस आहार, थोड्या थोड्या प्रमाणात, दिवसातून चार वेळेस घेतल्यास ते अधिक फायद्याचे होते.

३.योग्य वेळी योग्य काळ विश्रांती – दिवसभराचे काम आटोपून रात्रीची जागरणे टाळेन, टीव्ही, संगणक, मोबाईल रात्री उशीरापर्यंत वापरणार नाही आणि रात्रीची ठराविक वेळ माझ्या झोपेची आहे. त्या वेळात सात ते आठ तास मी शांत झोपणार आहे. हा निश्चय नव्या वर्षापासून अमलात आणण्याचा प्रयत्न करेन.

४.वाईट सवयींचा त्याग – चहा, कॉफी, कोला पेये, धूम्रपान, मद्यपान, इतर व्यसने, अतिरेकी प्रमाणात जंक फूड खाणे अशा माझ्या आरोग्याला घातक ठरणाऱ्या सवयींपासून मी स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करेन.

५. आवश्यक  शारीरिक  तपासण्या – आरोग्याला आवश्यक असलेल्या रक्त, लघवी, वैद्यकीय शारीरिक तपासण्या वेळच्या वेळी करणे आवश्यक आहे. त्यासाठी निश्चित वेळ ठरवून या तपासण्या करुन घेईन आणि त्या वेळीच डॉक्टरांनाही दाखवेन. नववर्षापासून कोणत्याही शारीरिक आणि मानसिक समस्येवर वेळेत उपचार घेण्याचा प्रस्ताव अंमलात आणेन.

६. मानसिक आरोग्य- नियमित ध्यानधारणा, रिलॅक्सेशनचे प्रकार, छंद जोपासणे, कुटुंबियांसमवेत, मित्रमैत्रिणींशी हास्य-विनोद बैठका केल्यास ताणतणाव दूर होऊन मानसिक शांतता मिळते. नूतन वर्षात या साऱ्या गोष्टी केल्यास निकोप आरोग्याला मनःशांतीचे भक्कम पाठबळ लाभेल.

डॉ.अविनाश भोंडवे, फॅमिली फिजिशियन