घर घेणं ही सामान्यांसाठी जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा आणि आर्थिकदृष्ट्या एक महत्त्वाचा निर्णय आहे. घर घेणे हा एक मोठा निर्णय असून ते घेण्यासाठीची पात्रता अनेक मध्यम उत्पन्न असणाऱ्या खरेदीदारांसाठी एक आवाहन असू शकते. म्हणूनच जॉइंट होम लोन हा होम लोन मिळण्याची शक्यता वाढण्यासाठी एक उत्तम मार्ग आहे. जॉइंट होम लोनमध्ये एका व्यक्तीऐवजी दोन किंवा सहा सह-अर्जदार एका घराचा वित्तपुरवठा करण्यासाठी अर्ज करू शकतात. हे करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक असते. साई इस्टेट कन्सलटंटन्सच्या अमित वाधवानी यांनी या संदर्भात दिलेल्या काही खास टिप्स…

क्रेडिट स्कोअर –

बँकांसाठी कर्जाची पात्रता आणि अर्जदाराने गृह कर्जावर व्याज देण्याची क्षमता यांचे मूल्यांकन करण्यासाठी क्रेडिट स्कोअर एक महत्त्वाचा घटक आहे. लोन घेणाऱ्यांसाठी चांगला क्रेडिट स्कोअर असण्याबरोबरच प्राथमिक अर्जदार असणे योग्य आहे, तर इतर सहकारी सह-अर्जदार असू शकतात. यामुळे अर्ज स्वीकारण्याची शक्यता वाढेल.

डाऊन पेमेंट –

बचतीच्या उपलब्धतेनुसार डाउन पेमेंट निश्चित करावे. बँकेच्या धोरणाच्या आधारावर, अर्जदारांनी मालमत्ता मूल्याचे कमीतकमी १० ते ३० टक्के डाउन पेमेंट म्हणून भरणे अपेक्षित असते.

कागदपत्रे –

जॉइंट होम लोनच्या बाबतीत सर्व सह-अर्जदारांना आपल्या क्लायंटच्या बाबतीत जाणून घेण्यासाठी त्यांच्या दस्तऐवजाचे निरीक्षण करावे लागते. सर्व सह-अर्जदारांना त्यांचे आयडीचे पुरावे, उत्पन्नाचे पुरावे आणि पत्त्याचे पुरावे सादर करणे आवश्यक असते.

ईएमआयसाठी भागाचे वाटप – 

जॉइंट लोनचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कर्जाची परतफेड करण्याची सामायिक जबाबदारी आहे. लोन भरण्यासाठी अर्जदार कोणतेही मार्ग निवडू शकतात; ते स्वतंत्रपणे ईएमआय भरू शकतात किंवा जॉइंट बँक खात्याद्वारे ईएमआय भरू शकतात. पैसे न भरल्यास किंवा डीफॉल्ट झाल्यास, कर्जदार सर्व कर्ज घेणाऱ्यांच्या विरोधात पुढे जाणार. जॉइंट होम लोनसाठी अर्ज करणे केवळ एक मोठे किंवा चांगले घर घेण्यासाठी फायदेशीर नाही तर कर लाभांमुळे खरेदीचे एकूण खर्च कमी करण्यातही फायदेशीर आहे.