सध्या आपल्यातील अनेक जणांची अर्ध्याहून अधिक कामे ही स्मार्टफोनवरच होतात. सतत वापरण्यात येणाऱ्या या डिव्हाईसची बॅटरीही त्यामुळे लगेच उतरते.    यासाठी कंपन्यांचेही बरेच प्रयत्न सुरु असून बॅटरी दीर्घकाळ काम करावी यासाठी कंपन्या विविध प्रयोग करताना दिसत आहेत. मात्र फोन चार्ज करताना आपणही काही गोष्टींची आवर्जून काळजी घ्यायला हवी ज्यामुळे फोन चार्ज होण्यास कमी वेळ लागेल. काय आहेत टीप्स पाहुयात

फोन ओरीजनल चार्जरने चार्ज करा – कोणताही स्मार्टफोन ज्या त्या कंपनीच्या चार्जरनेच चार्ज करायला हवा. त्यामुळे फोन आणि चार्जर दोन्ही चांगले राहण्यास मदत होते. या चार्जरने कमी वेळात आणि योग्य पद्धतीने बॅटरी चार्ज होते.  चार्जर  खराब झाला तरी कंपनीच्या सर्व्हीस सेंटरमध्ये जाऊन नवीन आणणे आवश्यक आहे. पण कोणत्याही  साध्या चार्जरने फोन चार्ज करु नये.

चार्जिंग करताना फोन फ्लाईट मोडवर ठेवा – फोन चार्ज करताना तो तुम्ही फ्लाईट मोडवर टाकल्यास चार्जिंग जास्त लवकर होते. तसेच यामुळे फोनकॉल, इंटरनेट, जीपीएस यांसारख्या सेवा बंद राहतात आणि बॅटरीही कमी वापरली जाते.

वायफाय आणि ब्लूटूथ कनेक्टीव्हीटी बंद ठेवा – अनेकदा आपण एकमेकांकडील डेटा घेण्यासाठी ब्लूटूथचा वापर करतो. तसेच वायफायचाही हल्ली सर्रास वापर करतो. फोन चार्जिंगला लावताना हे बंद करायचे आपण विसरुन जातो. मात्र या गोष्टी लक्षात ठेऊन वेळीच बंद केल्यास फोन जास्त वेगाने चार्ज होण्यास मदत होते.

एनएफसी मोड – आपल्या फोनमध्ये एनएफसी मोड असतो. हा मोड बंद करुन मगच बॅटरी चार्ज करावी. यामुळे वेळ वाचतो.

बॅटरी सेव्हर मोड – सध्या जवळपास सगळ्याच स्मार्टफोनमध्ये बॅटरी सेव्हर मोड असतो. हा मोड ऑन ठेवल्यास आपल्या फोनची बॅटरी सेव्ह होण्यास मदत होते. त्यामुळे फोन चार्ज करतानाही हा मोड ऑन ठेवल्यास त्याचा फायदा होतो.

ब्राईटनेस कमी ठेवा – फोनच्या ब्राईटनेसमुळे फोनची बॅटरी लवकर डिस्चार्ज होते. त्यामुळे हा ब्राईटनेस कायमच शक्य तितका कमी ठेवावा.