‘रक्तदान श्रेष्ठदान’, असे म्हटले जाते. अपघातग्रस्त किंवा आजारी व्यक्तीचा जीव वाचविणारे रक्तदान खऱ्या अर्थाने अतिशय श्रेष्ठदान असते. रक्तदानामुळे रक्तदात्यालाही अनेक फायदे होतात. मात्र रक्तदान करताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते. अन्यथा त्यातून होणारे संसर्ग आजारी व्यक्तीचा जीव घेण्यास कारणीभूत ठरु शकतात. आपल्यातील अनेकांनी कधी ना कधी रक्तदान नक्कीच केले असेल किंवा अनेक जण करण्याचा विचार करत असतील. पण काही जण रक्तदान करायला घाबरतात. मात्र यामध्ये घाबरण्यासारखे काहीही नाही, त्याबाबत मनात असणारे गैरसमज दूर करण्याची आवश्यकता आहे. रक्तदानाबाबत काही गोष्टी अवश्य लक्षात ठेवायला हव्यात…

१. एखाद्या व्यक्तीला एड्स किंवा कर्करोगासारखा मोठा आजार असेल तर अशा व्यक्तीने चुकूनही रक्तदान करु नये.

२. रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला हृदयरोगाचा धोका कमी असतो असे एका अभ्यासातून समोर आले आहे.

३. तुम्ही शरीरावर टॅटू किंवा कॉस्मॅटीक सर्जरी केली असेल तर त्यानंतर किंमान ४ महिने रक्तदान करु नये.

४. महिलांना मासिक पाळी सुरु असताना तसेच गर्भवती असताना आणि इतर गर्भाशयाशी निगडीत आजार असताना रक्तदान करणे धोक्याचे आहे.

५. मधुमेह, रक्तदाब यांसारखे दिर्घकाळ टिकणारे आजार असल्यास रक्तदान करणे रक्तदाता आणि रक्त घेणारा दोघांसाठी धोक्याचे असते. त्यामुळे या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यायला हवी.

१ ऑक्टोबरपासून फेसबुकनेही एक नवं फिचर आणलं आहे. या फिचरच्या माध्यमातून तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या रक्तदात्यांची माहिती तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे सोशल मीडियाही रक्तदानाच्या बाबतीत जागरुक झाला असून प्रचार आणि प्रसाराचे काम करत असल्याचे म्हणता येईल.

(ही बातमी वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)