केटॅमाइनचा फवारा म्हणजे स्प्रे नाकात मारल्यास त्याचा नैराश्यावर उपयोग होतो व आत्महत्येचे विचार कमी होतात असे अभ्यासात दिसून आले आहे. ड्रग्ज पाटर्य़ामध्ये त्याचा वापर केला जातो. अमेरिकन जर्नल ऑफ सायकिअ‍ॅट्री या नियतकालिकात याबाबतचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. प्लासेबो म्हणजे खोटे औषध व केटॅमाइन यांची तुलना केली असता त्यात केटॅमाइनच्या वापराने नैराश्याचे प्रमाण कमी झालेले दिसून आले. ज्या लोकांमध्ये आत्महत्येच्या भावना तीव्र असतात त्यांच्यातही चांगला परिणाम दिसून आला. अमेरिकेतील येल स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी ६८ रुग्णांचे दोन गट करून एकाला प्लासेबो तर दुसऱ्याला एसकेटॅमाइन दिले असता दोन आठवडय़ांनी एसकेटॅमाइनचा फवारा दिलेल्या रुग्णात चांगला परिणाम दिसून आला. आठवडय़ातून दोनदा त्यांच्यावर हा प्रयोग करण्यात आला. चार तास, २४ तास व २५ दिवस अशा टप्प्प्यांनी त्याचा परिणाम तपासण्यात आला. त्यात आत्महत्येचे विचार कमी  झालेले दिसून आले, तसेच नैराश्याचे प्रमाण कमी दिसले. एसकेटॅमाइनचे परिणाम २५ दिवस दिसतात. एसकेटॅमाइन हे अँटिडिप्रेसंट औषधांचा परिणाम दिसण्यास विलंब होत असल्याने मधल्या काळात करता येऊ शकतो. अनेक अँटिडिप्रेसंट औषधांना परिणाम दाखवण्यास चार ते सहा आठवडे लागतात.

असे असले तरी कुणीही हा प्रयोग करून पाहू नये, कारण हे संशोधन पातळीवरचे मत आहे. शिवाय त्यावर आणखी संशोधनाची गरज आहे असा धोक्याचा इशाराही देण्यात आला आहे.