दक्षिण कोरियाची ख्यातनाम कार निर्माती कंपनी Kia Motors ने भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रामध्ये शानदार पदार्पण केलं आहे. Kia Motors ने भारतीय बाजारात गुरूवारी(दि.20) आपली पहिली एसयूव्ही प्रकारातील कार Seltos सादर केली. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली ही कार ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत लाँच केली जाण्याची शक्यता आहे. तर, जुलै महिन्यामध्ये या कारसाठी आगाऊ नोंदणी सुरू होईल. कंपनीचे देशभरात एकूण 265 टचपॉइंट्स असतील, याद्वारे देशात सर्वत्र ही कार विक्रीसाठी उपलब्ध असेल.

‘किआ मोटर्स’च्या या एसयूव्हीमध्ये इंजिनसाठी तीन पर्याय असतील. यातील एक 1.4-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल, दूसरं 1.5-लिटर पेट्रोल आणि तिसरं 1.5-लिटर डिझेल इंजिन असेल. सर्व इंजिन ‘भारत स्टेज 6’ (बीएस 6) मानकांनुसार असतील. 1.5-लिटरच्या पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह 6-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन स्टँडर्ड असून दोन्ही इंजिनमध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय देखील उपलब्ध आहे. 1.4-लिटर टर्बोचार्ज्ड इंजिनसह 7-स्पीड ड्युअल क्लच ट्रांसमिशनचा पर्याय आहे.

कनेक्टेड कार –
ही कनेक्टेड कार आहे. यामध्ये UVO Connect नावाची एक कनेक्टिव्हिटी सिस्टिम आहे. यात नेव्हिगेशन, सेफ्टी-सिक्युरिटी, व्हेइकल मॅनेजमेंट, रिमोट कंट्रोल आणि कनव्हिनियन्स या 5 श्रेणीअंतर्गत 37 फीचर्स देण्यात आलेत. अँड्रॉइड ऑटो, अॅपल कार-प्ले आणि नेव्हिगेशनसह 10.25 इंच टचस्क्रीन इंफोटेन्मेंट सिस्टिम, 8-स्पीकर साउंड सिस्टिम, एअर प्यूरिफायरसाठी रिमोट कंट्रोल, रिमोट इंजिन स्टार्ट-स्टॉप, व्हेइकल ट्रॅकिंग, व्हॉइस कमांड, 8-स्पीकर साउंड सिस्टिम, 360 डिग्री सराउंड कॅमेरा, 6-एअरबॅग, एबीएस, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, व्हेइकल स्टेबिलिटी मॅनेजमेंट, हिल स्टार्ट असिस्ट, फ्रंट व रिअर पार्किंग सेंसर्स आणि ब्लाइंड स्पॉट व्ह्यू मॉनिटर यांसारखे फीचर्स आहेत. 11 ते 18 लाख रुपयांच्या दरम्यान या कारची किंमत असू शकते.