Kia Motors ने गेल्या वर्षी Seltos एसयूव्हीसह भारतीय बाजारात एंट्री केली. ही एसयूव्ही भारतात चांगलीच लोकप्रिय ठरली.  गेल्या वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या सलग दोन महिन्यांमध्ये एसयूव्ही प्रकारात विक्रीच्या बाबतीत अव्वल ठरलेल्या Kia Seltos च्या किंमतीत आता नववर्षात वाढ झाली आहे. लाँचिंगवेळी या गाडीची किंमत 9.69 लाख ते 16.99 लाख(एक्स शोरूम) रुपयांच्या घरात होती. पण आता कंपनीने सेल्टोसच्या किंमतीत 35 हजार रुपयांपर्यंत वाढ केली आहे. परिणामी, या गाडीची किंमत आता 9.89 लाख ते 17.34 लाख रुपये झाली आहे. एक जानेवारीपासून नव्या किंमती लागू झाल्या आहेत.

किंमत वाढल्यानंतर सेल्टॉस पेट्रोल इंजिन मॉडेल आता 9.89 लाख ते 14.09 लाख रुपयांमध्ये (एक्स शोरूम) उपलब्ध आहे. बेस व्हेरिअंटची किंमत 20 हजार आणि टॉप व्हेरिअंटची किंमत 30 हजार रुपयांनी वाढली आहे. टर्बो पेट्रोल इंजिन असलेल्या मॉडेलची किंमत 30 हजार रुपयांनी वाढली असून आता 13.79 लाख ते 17.29 लाख रुपयांमध्ये उपलब्ध आहे. डिझेल इंजिन सेल्टॉसची किंमतही 35 हजार रुपयांनी वाढून 10.34 लाख ते 17.34 लाख रुपये झाली आहे.

कशी आहे सेल्टॉस –

दोन डिझाइनच्या पर्यायांसह ही कार भारतीय बाजारात उतरवण्यात आली असून बाजारात या कारची एमजी हेक्टर, टाटा हॅरियर आणि ह्युंडई क्रेटा यांसारख्या एसयूव्हीशी स्पर्धा असेल. विविध सात रंगांच्या पर्यायांमध्ये ही कार उपलब्ध आहे. टेक लाइन आणि जीटी लाइन अशा दोन डिझाइनमध्ये ही कार लाँच करण्यात आली आहे. कॉम्पॅक्ट एसयूव्ही प्रकारात एखादं मॉडल दोन डिझाइनच्या पर्यायांसह लाँच केली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. टेक लाइन अधिक प्रीमियम आणि फॅमिली-ओरिएंटेड स्टायलिंग पॅकेजसह आहे. तर, जीटी लाइनची स्टाइल स्पोर्टी आहे. याद्वारे तरुणांना आकर्षित करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. टेक लाइनमध्ये पाच व्हेरिअंट आणि जीटी लाइनमध्ये तीन व्हेरिअंटचे पर्याय उपलब्ध आहेत.

किआ सेल्टॉसच्या इंजिनचे तीन पर्याय आहेत. यामध्ये 1.4-लिटर पेट्रोल टर्बोचार्ज्ड, 1.5-लिटर पेट्रोल आणि 1.5-लिटर डिझेल इंजिनचा समावेश आहे. सर्व इंजिन ‘भारत स्टेज 6’ (बीएस 6) मानकांनुसार आहेत. ह्युंडई क्रेटासारख्या प्लॅटफॉर्मवर Seltos आधारीत आहे. तुलनेने सेल्टोस नक्कीच थोडीफार मोठी आहे. 1.5-लिटरच्या पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह 6-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन स्टँडर्ड असून दोन्ही इंजिनमध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय देखील उपलब्ध आहे. 1.4-लिटर टर्बोचार्ज्ड इंजिनसह 7-स्पीड ड्युअल क्लच ट्रांसमिशनचा पर्याय आहे.

कनेक्टेड कार –
ही कनेक्टेड कार आहे. यामध्ये UVO Connect नावाची एक कनेक्टिव्हिटी सिस्टिम आहे. यात नेव्हिगेशन, सेफ्टी-सिक्युरिटी, व्हेइकल मॅनेजमेंट, रिमोट कंट्रोल आणि कनव्हिनियन्स या 5 श्रेणीअंतर्गत 37 फीचर्स देण्यात आलेत. अँड्रॉइड ऑटो, अॅपल कार-प्ले आणि नेव्हिगेशनसह 10.25 इंच टचस्क्रीन इंफोटेन्मेंट सिस्टिम, 8-स्पीकर साउंड सिस्टिम, एअर प्यूरिफायरसाठी रिमोट कंट्रोल, रिमोट इंजिन स्टार्ट-स्टॉप, व्हेइकल ट्रॅकिंग, व्हॉइस कमांड, 8-स्पीकर साउंड सिस्टिम, 360 डिग्री सराउंड कॅमेरा, 6-एअरबॅग, एबीएस, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, व्हेइकल स्टेबिलिटी मॅनेजमेंट, हिल स्टार्ट असिस्ट, फ्रंट व रिअर पार्किंग सेंसर्स आणि ब्लाइंड स्पॉट व्ह्यू मॉनिटर यांसारखे फीचर्स आहेत.