टेक्सास विद्यापीठाचे संशोधन
ग्रील केलेले, लोखंडी अथवा लाकडी जाळीवर भाजलेले मांस आरोग्यासाठी धोकादायक असते. त्यामुळे मूत्रपिंडाचा कर्करोग होण्याची भीती आहे, असा दावा ह्युस्टन येथील वैद्यकीय तज्ज्ञांनी केला आहे. ग्रील करताना वा लोखंडी जाळीवर उच्च तापमानात मांस भाजले जाते. त्यामुळे ते खाद्य अपायकारकच आहे, असेही या वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.
मांसाहारी पदार्थाचा आरोग्यावर परिणाम या विषयावर हे वैद्यकीय तज्ज्ञ अभ्यास करत आहेत. सध्या ग्रील्ड मांस आणि विशिष्ट जाळीदार भांडय़ात शिजवलेले मांस सेवन करणे अनेकांना आवडत आहे. हे मांस रुचकर असेलही, मात्र ते शरीरासाठी अपायकारक आहे, असा इशारा या तज्ज्ञांनी दिला.
‘रिनल सेल कार्सिनोमा’ हा मूत्रपिंड कर्करोगाचा एक प्रकार असून, त्याचे प्रमाण अमेरिकेत आणि विकसित देशांत वाढत आहे. आधुनिक जीवनशैली, आहारात मांसाचा अतिवापर, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ आणि स्टार्चचा अधिक वापर यामुळे हे प्रमाण वाढल्याचे या तज्ज्ञांनी सांगितले. टेक्सास विद्यापीठातील या वैद्यकीय तज्ज्ञांनी डॉ. फेंग वू यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन सुरू केले आहे.
अनेक लोक ग्रील केलेल्या मांसाचे सेवन करत असल्याने त्यांना मूत्रपिंड कर्करोग होत असल्याचे या तज्ज्ञांना आढळले. अमेरिकेत अशा प्रकारचा कर्करोग झालेल्या ६५९ रुग्णांच्या आहाराचा अभ्यास केल्यानंतर हे रुग्ण ग्रील मांसाचे अधिक सेवन करत असल्याचे आढळले.
उच्च तापमानात मांस भाजल्यावर त्यावर कर्करोग उद्भवणारी रसायने तयार होतात. त्याचा हानीकारक प्रभाव शरीरावर होत असतो. त्यामुळे अशा प्रकारचे मांस खाणे टाळणेच योग्य, असे डॉ. फेंग वू यांनी सांगितले. या संशोधनाचा अहवाल ‘जरनल कँसर’मध्ये प्रसिद्ध झाला आहे.