वाढत्या हवाप्रदूषणामुळे मूत्रपिंडाचे आजार वाढण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम म्हणून कालांतराने मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका असल्याचा इशारा अभ्यासात देण्यात आला आहे.

हवाप्रदूषणामध्ये सध्या मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असून, त्याचा आरोग्यावर परिणाम होत आहे. हवाप्रदूषणामुळे हृदयविकार, स्ट्रोक, कर्करोग, अस्थमा आणि फुप्फुसाचे आजार निर्माण होतात.

अमेरिकेच्या वॉशिंग्टन विद्यापीठातील स्कूल ऑफ मेडिसिनने याबाबत संशोधन करून हवाप्रदूषणामुळे होणाऱ्या आजारामध्ये मूत्रपिंड आजाराचाही समावेश केला आहे.

संशोधकांनी २००४ पासून हवाप्रदूषणामुळे मूत्रपिंडावर काय परिणाम होतो यासाठी जवळपास २.५ दशलक्ष लोकांचा ८.५ वर्षे अभ्यास केला. यामध्ये हवेच्या दर्जाची पातळी आणि मूत्रपिंडाचे कार्य आणि आजार याबाबतच्या माहितीची तुलना केली.

यामध्ये त्यांना मूत्रपिंड आजाराशी संबंधित ४४,७९३ नवी प्रकरणे आढळून आली. तसेच हवाप्रदूषणाच्या उच्चतम पातळीमुळे मूत्रपिंड निकामी झाल्याची २,४३८ प्रकरणे आढळून आली.

फुप्फुसांप्रमाणेच मूत्रपिंडेदेखील अशुद्ध झालेले रक्त शुद्ध करण्याचे काम करत असतात.

तसेच शरीरातील आम्ल आणि आल्कली यांचे संतुलन कायम राखण्याचे कामही मूत्रपिंड करत असते. मात्र जर हवाप्रदूषणामध्ये वाढ झाल्यास मूत्रपिंडावर त्याचा विपरीत परिणाम होत असून, त्यामुळे विविध आजारांना निमंत्रण मिळत असल्याचे संशोधकांनी सांगितले.