05 June 2020

News Flash

मुतखड्यावर करा घरच्याघरी आयुर्वेदिक उपाय

मूतखडासाठी आयुर्वेदात काही औषध आहे का, असा प्रश्न विचारणारी बरीच मंडळी भेटतात. अनेकांना तर आज औषध घेतले की उद्या मूतखडा बाहेर पडायला हवा असतो.

मूतखडासाठी आयुर्वेदात काही औषध आहे का, असा प्रश्न विचारणारी बरीच मंडळी भेटतात. अनेकांना तर आज औषध घेतले की उद्या मूतखडा बाहेर पडायला हवा असतो. आपल्या मूत्रवहन संस्थेशी संबंधित असणाऱ्या या व्याधीचे प्रमाण भारतात बरेच आहे. मूतखडय़ाचा त्रास असणाऱ्यांना शस्त्रक्रियेवाचून तो बरा करण्यामध्ये अधिक स्वारस्य असते. त्यामुळे ही मंडळी अगदी जाहिरात वाचूनही कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधोपचार घेत असतात. ते धोकादायकही ठरू शकते. कारण आयुर्वेदाने मूतखडय़ाचे प्रकार सांगितलेले असून त्या प्रकारानुसार चिकित्सा करावी लागते. त्यामुळे कोणत्याही मूतखडय़ावर लागू पडेल असे एकच एक औषध आयुर्वेदात नाही.

आयुर्वेदशास्त्राने या मूतखडय़ाचे सविस्तर वर्णन आपल्या ग्रंथातून केलेले आहे. आयुर्वेद संहितांमध्ये या व्याधीचा उल्लेख अश्मरी असा केलेला आढळतो. या अश्मरीचे एकूण चार प्रकार आयुर्वेदाने सांगितलेले आहेत. वातज अश्मरी, पित्तज अश्मरी, कफज अश्मरी, शुक्रज अश्मरी. यापैकी पहिले तीन प्रकार हे वात-पित्त-कफ या शरीर घटकांपैकी ज्या घटकाचे प्राबल्य व्याधीत असेल त्यानुसार पडतात, असे सांगितलेले आहे. शेवटच्या प्रकारात शुक्रधातूशी संबंधित ही व्याधी असते.

सामान्य लक्षणे : मूतखडय़ाच्या सर्वसामान्य लक्षणांमुळे नाभी, मूत्राशय (बस्ती) या ठिकाणी वेदना- मूत्रप्रवृत्तीच्या वेळी वेदना, मूत्राची धार तुटक येणे, पाठीच्या खालील भागांत दोन्हीं किंवा एका बाजूस वेदना, मूत्रावाटे रक्त पडणे, मूत्रप्रवृत्तीचे वेळी आग होणे अशा लक्षणांचा सामावेश होतो. मूतखडय़ाच्या प्रकारानुसार त्या व्याधींमध्ये वेगवेगळी लक्षणे दिसतात. यात प्रत्येक प्रकारची चिकित्साही वेगवेगळी असल्या कारणाने ही लक्षणे नीट लक्षात घ्यावी लागातात. वातदोषामुळे निर्माण होणाऱ्या मूतखडय़ाच्या वेदना या अनेक वेळी तीव्र स्वरूपाच्या असतात. रोग्यास या प्रकारात मूत्रप्रवृत्तीचे वेळेस वेदना होतात.

या प्रकारात मूतखडय़ाचा रंग काळसर तांबूस असतो. त्यावर काटे असतात. या प्रकारामध्ये थेंब थेंब लघवीला होते. पित्तामुळे होणाऱ्या मूतखडय़ामध्ये आग होणे हे लक्षणे असते. यामध्ये लघवीला जळजळ होणे, तसेच मूत्राशयातही जळजळ होणे, लघवीला पिवळी, कधी लालसर होणे अशी लक्षणे दिसतात. या मूतखडय़ाच्या आकार बिब्यातील बी एवढा असतो. कफामुळे होणाऱ्या मूतखडय़ामध्ये टोचल्यासारखी जाणीव होते. त्या ठिकाणी जडत्व निर्माण होते. या प्रकारात मूतखडा मोठा गुळगुळीत असा असतो. मूतखडय़ाचा चौथा प्रकार म्हणजे शुक्रजन्य मूतखडा. मोठय़ा पुरुषांमध्ये शुक्रधातू स्खलन होत असताना त्याचा रोध करण्याची सतत सवय असल्यास या प्रकाराचा मूतखडा निर्माण होतो.

आयुर्वेदीय चिकित्सेची दिशा : विविध आयुर्वेदीय ग्रंथकारांनी मूतखडय़ावर आयुर्वेदीय चिकित्सेचे वर्णन केलेले आहे. व्यवहारात अनेक वैद्य त्याचा उपयोग करतात. मूतखडय़ाच्या प्रत्येक प्रकारानुसार चिकित्सा बदलते. तो वातजन्य असल्यास त्यावर विविध प्रकारचे काढे उपयोगी पडतात. यामध्ये गोखरू, सुंठ, अग्निमंथ, पाषाणभेद, शेवग्याची साल, वरुण, हिरडा, बाह्य़ाची शेंग, जवखार, हिंग, अर्जुनसादडा अशा विविध औषधांचा उपयोग केला जातो. वेदना कमी होण्यासाठी बाहेरून किंचित शेक घ्यावा लागतो. तीव्र वेदनांवर त्वरित वैद्यकीय मदत घेणे इष्ट ठरते. पित्ताच्या मूतखडय़ावर लकडी पाषाणभेद काढा, शिलाजित आणि साखर हे मिश्रण उपयुक्त ठरते. कफाच्या मूतखडय़ावर शेवगा आणि अर्जुनसादडा यांचा काढा उपयुक्त ठरतो. योगरत्नाकर या आयुर्वेदीय ग्रंथाने ही सर्व चिकित्सा सांगितलेली आहे. या चिकित्सेचा उपयोग स्वत: करू नये. त्यासाठी वैद्यकीय सल्ला आवश्यक असतो. या चिकित्सेखेरीज इतर प्रकारची द्रव्ये आयुर्वेदात सांगितलेली आहेत. चंदनासव, पुनर्नावासव, चंद्रप्रभा, गोक्षुरादी गुगुळ अशा काही औषधांचा उपयोग मूतखडय़ाच्या विशिष्ट अवस्थेमध्ये वैद्यकीय सल्ल्याने करता येतो. मूतखडा खूप मोठय़ा आकाराचा असल्यास तो शस्त्रक्रियेने काढून टाकावा लागतो.

वैद्य विजय कुलकर्णी, आयुर्वेद चिकित्सक ayurvijay7@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2020 4:11 pm

Web Title: kidney stone treatment at home nck 90
Next Stories
1 साखरेविना घरीच्या घरी करा बदाम बर्फी
2 Coronavirus : मधुमेह व रक्तदाबाच्या रुग्णांनो सावधान!
3 Coronavirus : लॉकडाउनमध्ये मुलांचा स्क्रीनटाइम कसा कमी करावा
Just Now!
X