मोटार चालवताना मोबाईलवर बोलण्यामुळे वाहनचालकाचे लक्ष जेवढे विचलित होते त्यापेक्षा १२ पटीने जास्त गाडीतील लहान मुलांमुळे होत असते, असे ऑस्ट्रेलियात करण्यात आलेल्या संशोधनातून स्पष्ट झाले. अशा पद्धतीने करण्यात आलेले हे पहिलेच संशोधन आहे. 
गाडी चालवताना त्यातील लहान मुलांमुळे सर्वसाधारणपणे पालकांचे लक्ष तीन मिनिटे २२ सेकंदांसाठी विचलित होते, असे संशोधकांना आढळले. मोनाश विद्यापीठातील अपघात संशोधन केंद्रातील संशोधकांनी हे संशोधन केले. या केंद्रातील सहयोगी प्राध्यापक जुदिथ चार्लटन आणि डॉ़. जान कोपेल म्हणाले, आम्ही एकूण १२ कुटुंबीयांच्या मोटारीमध्ये गाडी चालवताना त्यांच्या हालचाली आणि वर्तणूक नोदवू शकेल, अशी यंत्रणा बसवली होती. एकूण तीन आठवड्यांसाठी या कुटुंबीयांच्या वाहन चालवतानाच्या हालचालींची नोंद ठेवण्यात आली. संशोधनात सहभागी झालेल्या सर्व कुटुंबीयांची एक ते आठ वयोगटातील प्रत्येकी दोन मुले होती.
एकूण ९२ फेऱयांमध्ये वाहन चालवताना चालकाचे लक्ष कितीवेळ विचलित झाले. त्याची कारणे काय होती, याचे विश्लेषण संशोधकांनी केले. त्यामधून त्यांना मोबाईलवर बोलण्यापेक्षा लहान मुलांमुळे चालकाचे लक्ष अधिकवेळ विचलित होते, असे आढळले. अनेक वाहनचालकांना आपल्या पाल्यामुळे आपले लक्ष विचलित होत असल्याचे लक्षात येत नाही. त्यामुळे यासंदर्भात त्यांचे प्रबोधन करण्याची गरज असल्याचे चार्लटन यांनी स्पष्ट केले.