दोन ते तीन वर्षे वयाच्या लहान मुलांच्या डोळ्यांची दर वर्षी नियमित तपासणी करून घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. अमेरिकेच्या ‘नॅशनल सेंटर फॉर चिल्ड्रन व्हिजन हेल्थ’च्या राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांच्या समितीने लहान मुलांच्या दृष्टी तपासणीबाबत हा सल्ला दिला आहे. शाळेत जाण्यापूर्वीच्या वयातील मुलांच्या दृष्टी दोषाबाबतची तपासणी वेळेत करणे गरजेचे असते. परंतु, या अत्यावश्यक बाबीकडे बहुतांश वेळा दुर्लक्ष होताना दिसून येते. परिणामी मुले योग्य उपचारापासून वंचित राहात असल्याचे निरीक्षण ‘ऑप्टोमेट्री अॅण्ड व्हिजन सायन्स’चे मुख्य संपादक अँथोनी अॅडम यांनी या विषयीच्या आपल्या अभ्यासपर लेखात नोंदविले आहे. दृष्टी तज्ज्ञांमार्फत योग्यवेळी समस्येचे निदान करून वेळेत आणि नियमित उपचार केल्यास मुलांना शालेय जीवनात वाचन समस्या उद्भवत नाही, त्याचबरोबर मुलांची सर्वसमावेशक वाढ चांगली होण्यास याचा फायदा होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.