स्वयंपाकघरात आपण रोज जे टॉवेल हात पुसण्यासाठी वापरत असतो, त्यामुळे घातक जीवाणूंचा प्रसार होऊन काही वेळा विषबाधेचा धोका निर्माण होतो, असे भारतीय वंशाच्या संशोधकाने केलेल्या पाहणीत दिसून आले आहे. एकूण ४९ टॉवेल यात तपासण्यात आले. त्यात जीवाणूंची वाढ जास्त प्रमाणात दिसून आली. कुटुंबातील जास्त सदस्य हे टॉवेल भांडी पुसणे, हात पुसणे, गरम भांडी पकडणे, साफसफाई करणे यासाठी वापरत असतात. त्यावर एका वापरातच बरेच जीवाणू येतात. टॉवेल ओले असल्याने त्यावर जीवाणू अधिक असतात. कोरडय़ा टॉवेलवर ते कमी असतात.

४९ टॉवेलमध्ये ३६.७ टक्के कोलीफॉर्म, ३६.७ टक्के एंटरोकॉकस, १४.३ टक्के एस ऑरियस जीवाणूंच्या वाढीस अनुकूल होते. स्वयंपाकघर व इतर कारणांनी होणारा जीवाणूंचा प्रसार यात तपासण्यात आला असे मॉरिशस विद्यापीठाच्या सुशीला बिरानजिया यांनी सांगितले. कुटुंबाच्या सवयी व कुटुंबाचा आकार तसेच रचना यावर जीवाणूंचा प्रसार अवलंबून असतो. १०० टॉवेल महिनाभराच्या वापरानंतर तपासले असता त्यावर वेगवेगळे जीवाणू आढळून आले. एस ऑरियस जीवाणूचे प्रमाण कमी सामाजिक व आर्थिक गटांच्या कुटुंबात जास्त दिसून येते. बहुवापराचे टॉवेल व ओले टॉवेल यात इशरेशिया कोली जीवाणू जास्त प्रमाणात आढळून आले. कोलिफॉर्म व एस ऑरियस जीवाणू मांसाहार करणाऱ्या कुटुंबात जास्त दिसून येतात.

इशेरिशिया कोलाय हा जीवाणू अनारोग्यकारक सवयी दाखवतो कारण तो विष्ठेतून पसरत असतो. यातून र्सवकष परिणाम म्हणून विषबाधा होण्याची शक्यताही असते अशी भीती त्यांनी व्यक्त केली.