अनेक नामांकित चॉकलेट्स ब्रँडना टक्कर देण्यासाठी किट-कॅटनं रुबी चॉकलेट्स पासून चॉकलेट वेफर्स स्टीक तयार केल्या आहेत. त्यामुळे किट-कॅट आता गुलाबी रंगातही पाहायला मिळणार आहे. किट- कॅट हा चॉकलेट ब्रँड जपानमधला सर्वात प्रसिद्ध चॉकलेट ब्रँड आहे. जपानी लोकांना आवडतील अशा चवीची चॉकलेट्स किट-कॅटनं तयार केली आहेत. अगदी ग्रीन टी, सुशी, मँगो, चेरी ब्लॉसम अशा विविध चवीत किट-कॅट चॉकलेट्स उपलब्ध आहेत, म्हणूनच किटकॅट हा ब्रँड जपानी लोकांचा आवडता ब्रँड ठरला आहे. आता नव्यानं आलेल्या रुबी चॉकलेट्स पासून किट-कॅटनं चॉकलेट तयार केलं आहे. सुरूवातील कोरिया आणि जपानमध्ये किट-कॅटचं रुबी चॉकलेट उपलब्ध होणार आहे. हे चॉकलेट्स ऑनलाइन ई-कॉमर्स साईटवर उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे एका स्टिकसाठी ग्राहकाला भारतीय रुपयांप्रमाणे साधरण २३० रुपये मोजावे लागणार आहेत.

गेल्याचवर्षी रुबी चॉकलेट्सचा शोध लावण्यात आला. गेल्या दहा वर्षांपासून संशोधक यावर काम करत होते. यापूर्वी ‘डार्क चॉकलेट’, ‘व्हाइट चॉकलेट’, ‘मिल्क चॉकलेट’ याच प्रकारात चॉकलेट्स अस्तित्त्वात होते. झ्युरिक स्थित कंपनी बेरी कॉलेबटनं ८० वर्षांनंतर पहिल्यांदाच अशा प्रकारचे चॉकलेट तयार केले. १९३० नंतर चॉकलेटचा नवा प्रकार तयार करण्यात या कंपनीला यश आलंय. रुबी चॉकलेट फिकट गुलाबी रंगाचे असते. रुबी कोकोआ बीन्सपासून गुलाबी रंगाचं रुबी चॉकलेट तयार करण्यात येते. आंबट, गोड, क्रिमी, फ्रुटी अशी मिश्र चव या नव्यानं शोधलेल्या चॉकलेट्सची आहे.

पुढील महिन्यात व्हॉलेन्टाईन डे आहे म्हणूनच नेस्लेनं किक-कॅट गुलाबी रंगात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचं ठरवलं आहे. किट-कॅटचा हा अनोखा फ्लेव्हर नामांकित ब्रँडना टक्कर देणार आहे. एकीकडे अनेक ग्राहक आरोग्याविषयी अधिक सजग होऊ लागल्यानं चॉकलेट्सच्या विक्रीवर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. म्हणूनच वेगवेगळ्या फ्लेव्हर्सचे चॉकलेट्स तयार करून अधिका अधिक ग्राहकांना आकर्षित करण्याचे कंपनीचे प्रयत्न सुरु आहे.