News Flash

गुडघ्याच्या अस्थिबंध (लिगामेंट) दुखापतीची लक्षणं आणि उपाय

शरीराचा ९० टक्के भार हा आपला गुडघा पेलत असतो

डॉ. मितेन शेठ

शरीराचा ९० टक्के भार हा आपला गुडघा पेलत असतो. त्यामुळे गुडघ्यांच्या आरोग्याकडे कायम लक्ष देण्याची गरज असते. बऱ्याच वेळा गुडघेदुखीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यामुळे अस्थिबंध अर्थात लिगामेंटच्या समस्या निर्माण होतात. गुडघ्यातील अस्थिबंध हे अत्यंत सूक्ष्म तंतूंपासून तयार केले असतात. मांडी आणि पोटरीला जोडणाऱ्या गुडघ्यावर या तंतूंचे आवरण असते. गुडघ्याच्या खालील गादी ही शरीराचे वजन पेलते. त्यामुळे लिगामेंटची दुखापत ही गंभीर स्वरूपाच्या संधीवाताला कारण ठरते. व्यायामाचा अभाव तसेच आहारात बदललेल्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा वाढून लहान वयातच सांधेदुखीचा आजार बळावत आहे. मैदानी खेळ खेळणारे खेळाडूदेखील तरुण वयातच सांधेदुखीच्या तक्रारी घेऊन येत आहेत. दोन हाडांना जोडून ठेवणारे हे सूक्ष्म तंतू अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात.

अचानक झालेला अपघात, खेळताना झालेली दुखापत, अचानक लागलेला मार,उडी मारताना चुकीच्या पध्दतीने खाली येणे यामुळे गुडघ्य़ातील अस्थिबंधाला इजा होण्याची शक्यता असते. गुडघ्याच्या सांध्यामध्ये चार प्रमुख अस्थिबंधल असतात यामध्ये एसीएल – एन्टेरिअर कृशिएट लिगामेंट,पीसीएल – पोस्टरिअर कृशिअल लिगामेंट, एमसीएल – मेडिअल कोलॅटरल लिगामेंट, एलसीएल – लॅटरल कोलॅटरल लिगामेंट यांचा समावेश आहे.

गुडघ्याच्या अस्थिबंध दुखापतीची लक्षणे

१. अचानकपणे गुडघ्यात तीव्र वेदना होणे.

२. शारीरिक हालचाली करताना गुडघ्यात वेदना होणे.

३. गुडघा हलवताना किंवा चालताना त्रास होणे, सांधा जखडून जाणे व पूर्ण सरळ करण्यास त्रास होणे.

४. गुडघ्याची तपासणी करताना सांध्याभोवती रुग्णांना वेदना होतात. सांध्याची पिळून विशेष तपासणी करताना त्या वेदना वाढतात किंवा गुडघ्यांतर्गत स्नायूंची अनैसर्गिक हालचाल जाणवते.

उपचार काय कराल?

१. प्रथमोपचारात गुडघ्याशी संबंधित असलेल्या कोणत्याही गंभीर जखमांवर उपचार करणे अधिक महत्त्वाचे आहे.

२. गुडघ्याचा जो भाग सर्वाधिक दुखतोय त्यावर बर्फाचा शेक घेणे.

३. जास्तीत जास्त विश्रांती घेणे. पायाची हालचाल कमी करणे.

४. डक्टरांच्या सल्ल्याने योग्य व्यायाम करणे.

५. तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच औषधे घेणे.

६. उपचारांचा कालावधी हा दुखापतीच्या स्वरूपावर आणि तीव्रतेवर अवलंबून असतो. बहुतेक जखमांचे औषधोपचाराने ब-यादेखील करता येऊ शकतात मात्र काही जखम या शस्त्रक्रियेनेच ब-या होऊ शकतात.

(डॉ. मितेन शेठ, हे द नी क्लीनिकमधील अस्थिविकार आणि गुडघेविकार शल्यविशारद आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2020 1:57 pm

Web Title: knee ligament pain repair treatment and relief steps ssj 93
Next Stories
1 रुग्णालयात मोबाइलच्या वापरावर निर्बंध घालण्याची सूचना
2 अत्यावश्यक नसलेल्या सामानाचीही विक्री करु द्या, Amazon-Flipkart ची सरकारला विनंती
3 17 वर्षांचा प्रवास संपला? Bajaj Discover वेबसाइटवरुन ‘गायब’
Just Now!
X