Tata Motors ची नवी कॉम्पॅक्ट एसयूव्ही Tata Harrier गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या गाडीच्या एक्सटीरियर आणि इंटिरियरचे अनेक टीझर व्हिडीओ समोर आल्यानंतर आता कंपनीने या नव्या एसयूव्हीचे स्पेसिफिकेशन्स, डायमेंशन आणि फिचर्सबाबत माहिती शेअर केली आहे. भारतीय बाजारात या एसयूव्हीमुळे Hyundai Creta, Renault Captur आणि Jeep Compass यांसारख्या गाड्यांना तगडी टक्कर मिळेल असं बोललं जात आहे. जाणून घेऊया हॅरियर एसयूव्हीची खासियत –

टाटा हॅरियर नव्या OMEGARC प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. टाटा मोटर्स आणि जॅग्वार लँड रोव्हर यांनी ही कार डेव्हलप केलीये. गाडीची लांबी 4598 mm, रुंदी 1894 mm आणि उंची 1706 mm आहे, तर व्हिलबेस 2741 mm आणि ग्राउंड क्लिअरंस 205 mm आहे. या दमदार कारमध्ये तुम्हाला 50-लीटर क्षमतेचा फ्युअल टँक मिळेल. याशिवाय रेडियल टायरसोबत 17-इंच अॅलॉय व्हिल्ज असेल. या कारमध्ये 2.0-लीटर क्रायोटेक डिझेल इंजिन देण्यात आलंय. हे इंजिन 3750 rpm वर 138 bhp पावर आणि 1750-2500 rpm वर 350 Nm पीक टॉर्क जनरेट करतं. चार सिलिंडर मोटर 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येणारी ही एसयूव्ही सध्या पेट्रोल इंजिन, ऑटोमॅटिक ट्रांसमिशन आणि ऑल व्हिल ड्राइव व्हर्जनमध्ये नाही मिळणार. सिटी, इको आणि स्पोर्ट्स अशाप्रकारच्या तीन ड्रायव्हिंग मोड्समध्ये ही कार उपलब्ध असेल. यामध्ये नॉर्मल, रफ आणि वेट मोड्ससह टेरेन रिस्पॉन्स सिस्टिमही उपलब्ध असेल. हॅरियरच्या समोरील बाजूस मॅकफर्सन स्ट्रट्ससोबत इंडिपेंडेंट फ्रंट सस्पेंशन आणि मागील बाजूला सेमी-इंडिपेंडेंट ट्विस्ट ब्लेड सेटअप आहे. ब्रेकिंगबाबत सांगायचं झाल्यास याच्या पुढील बाजूला डिस्क आणि मागील बाजूला ट्रम ब्रेक आहेत.

फिचर्स –
या एसयूव्हीमध्ये अनेक शानदार फिचर्स आहेत. एकूण चार व्हेरिअंट्समध्ये ही कार उपलब्ध असेल. यामध्ये एक्सई, एक्सएम, एक्सटी आणि एक्सझेडचा समावेश आहे. यामध्ये फॉलो-मी-होम फंक्शनसह प्रोजेक्टर लेंस हेडलॅम्प्स, एलईडी डे-टाइम रनिंग लाइट्स, फॉग लॅम्प, एलईडी टेललाइट्स आणि आउट साइड व्ह्यू मिररमध्ये टर्न इंडिकेटर्स आहेत. कॅबिन फॉक्स वुड इंसर्ट्ससोबत ब्लॅक आणि ब्राउन कलर थीम आहे. यामध्ये प्रीमियर फॅब्रिक आणि लेदर अपहोल्स्ट्रीचा पर्याय मिळेल. हॅरियरमध्ये पूश बटन स्टार्ट-स्टॉप, सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट कंसोल, मल्टी-फंक्शन स्टिअरिंग व्हिल, हाइट अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, ऑटो क्लायमेट कंट्रोल आणि कूल्ड ग्लवबॉक्स आहे. 8.8 इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम कारमध्ये आहे. ही इन्फोटेनमेंट सिस्टिम अॅपल कार-प्ले, अँन्ड्रॉइड ऑटो, मिरर लिंक आणि नेव्हिगेशन सपोर्टसह आहे. टॉप व्हेरिअंट्समध्ये 9-स्पीकर जेबीएल ऑडियो सिस्टिम मिळेल. यामध्ये सर्व अत्याधुनिक सुरक्षाविषयक फिचर्सचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये सिटबेल्ट रिमाइंडरसह 3-पॉइंट सिटबेल्ट्स देण्यात आले आहेत. एसयूव्हीमध्ये 6-एअरबॅग्स, ISOFIX सिट्स, इबीडी, एबीएस, कॉर्नर स्टॅबिलिटी कंट्रोलसह ईएसपी, ऑफ रोड एबीएस, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल होल्ड कंट्रोल, हिल डीसेंट कंट्रोल, रोलओव्हर मिटिगेशन आणि ब्रेक असिस्ट यांसारखे अनेक फिचर्स आहेत. थर्मिस्टो गोल्ड, कॅलिस्टो कॉपर, एरियल सिल्व्हर, टेलिस्टो ग्रे आणि ऑर्कस व्हाइट या कलर्समध्ये ही कार खरेदी करता येईल. जानेवारी 2019 मध्ये ही कार लाँच होणार आहे.