पावसाळा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो वातावरणातील गारवा आणि निर्सगाने ओढलेली सुंदर हिरवाईची चादर. पावसाच्या सरी कोसळायला लागल्यावर संपूर्ण वातावरण बदलून जातं. त्यामुळे अनेकांना हा ऋतू हवाहवासा वाटतो. मात्र या ऋतूमध्ये नवचैतन्यासोबतच काही साथीचे आजारही ओघाओघाने येत असतात. त्यामुळे या काळात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. अनेक वेळा ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे डासांची पैदास होते. तसंच बऱ्याच वेळा गढूळ पाण्याचाही पुरवठा होत असतो. त्यामुळे ताप, सर्दी, खोकला किंवा अन्य काही आजार होण्याची शक्यता असते. म्हणूनच या काळात होणारे आजार, त्यांची लक्षणे, उपचार याबाबत पुरेशी माहितीही असायला हवी. जाणून घेऊया अशाच काही आजारांविषयी…

१. श्वसनाचे आजार-

अनेक वेळा आपल्याला सर्दी -खोकला झाला की आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र पावसाळ्यात ताप, सर्दी -खोकला झाल्यास त्याकडे दुर्लक्ष करु नका. कारण या सर्दी खोकल्याचे रुपांतर अनेकदा ब्राँकायटिस, अस्थमा, न्युमोनिया, सीओपीडी अशा गंभीर आजारांमध्ये होते. अशा केसमध्ये रुग्णाला अतिदक्षता विभागात दाखल करून उच्च दर्जाची औषधे आणि प्राणवायूदेखील लावावा लागतो.

२. डेंगी–

पावसात साचलेल्या स्वच्छ पाण्यात अंडी घालणाऱ्या एडीस इजिप्ती नावाच्या डासांमुळे हा होतो. डेंगीचे विषाणू डासांद्वारेच माणसाच्या शरीरात शिरतात. या आजारात खूप ताप येतो, प्रमाणाबाहेर डोके दुखते, हातापायांचे सांधे, हाडे खूप दुखतात आणि महत्वाचे म्हणजे शरीरावर विशेषतः पाठीवर एक बारीक लालसर, न खाजणारी पुरळ येते. इतकंच नाही तर यात रक्तातील प्लेटलेट्स झपाट्याने कमी होतात. लघवी, शौच, थुंकीमधून तसेच शरीरांतर्गत रक्तस्त्राव होतो.

३.स्वाईन फ्लू-

ढगाळ हवामान असेल आणि हवामानाच्या कमाल आणि किमान तापमानात खूप फरक असेल तर एच् १ एन् १ आणि इन्फ्लुएन्झा जातीच्या इतर विषाणूंचा संसर्ग होऊन स्वाईन-फ्लूची लागण सुरू होते.

४. मलेरिया-
अनेक वेळा पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचून डबके तयार होतात. अशा डबक्यांमध्ये अॅनॉफेलिस डासांची पैदास होते. या डासांमुळे मलेरियाचा फैलाव होतो. मलेरिया झाल्यावर थंडी वाजून ताप येणे, हिमोग्लोबिन कमी होऊन कावीळ होणे ही लक्षणे दिसतात. मलेरियाच्या एका प्रकारात हा आजार मेंदूमध्ये शिरून रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होतो.

५. चिकुनगुनिया-

हा विषाणू हा एडीस जातीच्या डासांद्वारे स्वच्छ पाण्यात निर्माण होऊन पसरतो. यात दोन-तीन दिवस ताप येतो, डोके दुखते, अंगावर विशेषतः पाठ,पोट,कंबर या भागांवर पुरळ येते आणि हातापायांचे सांधे विलक्षण दुखू लागतात. हे दुखणे अतिशय तीव्र प्रमाणात असते. पायांचे घोटे, गुडघे, तळपायांचे सांधे यांना या आजारात विशेषकरून त्रास होतो. साधे चालणे, पायांची मांडी घालणेसुध्दा वेदनाकारक होते. आजार बरा झाला तरी पुढील बराच काळ हे हात-पाय दुखणे सुरूच राहते.

अशी घ्या काळजी

१.पावसाळ्यात शक्यतो भिजणे टाळावे. रेनकोट, टोपी, छत्री, किमान पावसाळी जाकिट आणि टोपी तरी वापरावी.

२. पावसात भिजल्यास लगेच अंग कोरडे करून पूर्ण वाळलेले स्वच्छ कपडे घालावेत.

३.केस पूर्णतः कोरडे करावेत, लांब केस असलेल्या महिलांनी व मुलामुलींनी ही खबरदारी घ्यावी.

४. खूप वेळ पावसात भिजून, अंगावर चिखल उडाला असल्यास गरम पाण्याने स्वच्छ आंघोळ करावी.

५. चिखलाने भिजलेले कपडे वेगळ्या बादलीतल्या पाण्यात भिजायला टाकावेत आणि त्यात डेटॉल किंवा सॅव्हलॉनसारख्या जंतूनाशक औषधाचे दोन चमचे न विसरता टाकावेत.

६. चिखलातील काही कृमी किंवा जंतू इतर कपड्यात जाऊ नये यासाठी ही काळजी घेणे अत्यावश्यक असते.

७. सर्दी खोकला झाल्यावर गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात. शक्यतो थंड पदार्थ, थंड पेये, ज्यूस घेऊ नयेत.

८. कडक ताप असल्यास किंवा खोकला सर्दी २-४ दिवसात कमी न झाल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.