News Flash

 जाणून घ्या कसे निवडावे योग्य क्रेडिट कार्ड   

खर्चाच्या सवयी, एखाद्या कार्डाचे लाभ आणि त्याची आकारणी ह्यांचा विचार करून योग्य ते कार्ड निवडायला हवे.

भारतात क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नोटाबंदीनंतर ऑनलाईन व्यवहारांचा वापर वाढल्याने प्लॅस्टिक मनी आणि ई-वॉलेट्स लोकप्रिय झाली आहेत. या पर्यायांमध्ये क्रेडिट कार्ड्‌स आकर्षक वाटतात कारण ती तुम्हाला आधी खर्च करून नंतर पैसे देण्याचा पर्याय देतात आणि डिस्काऊंट्स व रिवॉर्डस्‌ही देतात. बाजारात नानाविध क्रेडिट कार्ड्‌स उपलब्ध असली तरी तुम्ही तुमच्या खर्चाच्या सवयी, एखाद्या कार्डाचे लाभ आणि त्याची आकारणी ह्यांचा विचार करून योग्य ते कार्ड निवडायला हवे. आता क्रेडिट कार्ड निवडताना नेमक्या कोणत्या गोष्टींचा विचार करावा ते पाहूया…

कार्डाच्या आकारण्या 

काही कार्ड्‌स मोफत असतात – म्हणजे त्यांच्यासाठी वार्षिक शुल्क किंवा नूतनीकरण शुल्क नसते. इतर कार्ड्‌स एक किंवा दोन्ही शुल्क लागू करू शकतात. काही पूर्वनिश्चित परिस्थितीत ह्या दोन्ही आकारण्या माफ करतात. मुख्यतः एखाद्या कार्डपासून रिवॉर्ड्‌स जितकी अधिक तितकी त्याची वार्षिक आकारणी जास्त असू शकते. इतर आकारण्यांमध्ये क्रेडिट-फ्री कालावधीनंतरच्या थकित शिलकीवर व्याज आणि दंडांचा समावेश आहे. म्हणूनच एखादे कार्ड निवडण्यापूर्वी रिवॉर्ड्सच्या जागी लागणारे चार्जेस माहिती करून घेणे आवश्यक आहे. केवळ क्रेडिट-फ्री कालावधीचा फायदा घेण्यासाठी तुम्ही एखादे क्रेडिट कार्ड घेत असाल तर फ्री क्रेडिट कार्ड उपयुक्त ठरू शकेल. कोणतेही कार्ड तुम्ही घेतलेत तरी त्याचे सर्व खर्च, दंड, व्याजदर वगैरे तपासून घ्या.

खर्च करण्याच्या सवयी

तुमच्या जीवनशैलीप्रमाणे क्रेडिट कार्ड घ्या. उदाहरणार्थ, तुम्हाला प्रवासाची आवड असू शकेल. म्हणून तुम्ही एखादे ट्रॅव्हल कार्ड घ्यावे जे तुम्हाला मोफत लाऊंज ॲक्सेस, सवलतीच्या दरात विमान तिकिटे आणि ऑनलाईन बुकिंगसाठी रिवॉर्ड्‌स पॉईंट्स देते. काही विशिष्ट कंपन्यांच्या सहयोगातून विशिष्ट ब्रँड्सची खरेदी केल्यावर क्रेडिट कार्ड कंपन्या रिवॉर्ड्स आणि लाभ देतात. काही को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड्‌सही असतात जी ब्रँड लॉयल्टीसाठी जलद लाभ देतात. उदाहरणार्थ तुम्ही नेहमी हवाई प्रवास करीत असाल तर तुम्हाला एअरलाईन को-ब्रँडेड कार्डाचा फायदा घेता येईल. या कार्डांवर तुम्ही अतिरिक्त मैलांचा प्रवास करू शकता म्हणजे विशिष्ट मर्यादा ओलांडल्यावर मिळणारा हा एक प्रकारचा डिस्काऊंटच आहे. तसेच जर तुम्ही एखाद्या शॉपिंग ब्रँडशी एकनिष्ठ असाल तर तुम्हाला एखाद्या विशिष्ट दुकानातून किंवा मॉलमधून किंवा शॉपिंग स्टोअरमधून खरेदी केल्यावर अतिरिक्त फायदे देणारे कार्ड तुम्हाला मिळू शकते. त्याउलट जर तुम्ही प्रसंगानुरूप खर्च करीत असाल आणि थोडी उधारी हवी असेल तर तुम्ही नो-फ्रिल्स कार्ड घेऊ शकता. या कार्डला प्रवेश शुल्क नसते आणि रिवॉर्ड्‌सही कमी असतात.

व्याज आकारणी

व्याजमुक्त कालावधी संपल्यानंतर क्रेडिट कार्डावरचे व्याजदर बहुधा खूप जास्त असतात. तुम्ही एखादे कार्ड निवडण्यापूर्वी ऑनलाईन शोध घ्या आणि बाजारात उपलब्ध असलेल्या क्रेडिट कार्ड्‌सची तुलना करून पाहा आणि कमीत कमी व्याज आकारणी करणारे उत्पादन निवडा. तसेच व्याजमुक्त कालावधी किती दीर्घ आहे याचाही विचार करा.

सुरक्षीकृत व असुरक्षीकृत क्रेडिट कार्ड

क्रेडिट कार्ड्‌स सुरक्षीकृत आणि असुरक्षीकृत अशा दोन्ही स्वरूपाची साधने म्हणून उपलब्ध असतात, तुम्ही कार्डासाठी काही तारण दिले आहे का यानुसार हा भेद असतो. सुरक्षीकृत क्रेडिट कार्डावरील क्रेडिटची मर्यादा त्यासाठी किती तारण ठेवले आहे, उदाहरणार्थ एखादी एफडी, त्यावरून निश्चित केली जाते. ज्यांना क्रेडिट इतिहास नाही किंवा जे असुरक्षीकृत कार्डासाठी पात्र नाहीत त्यांच्यासाठी अशा कार्डाची मदत होते. एकदा तुमचा क्रेडिट इतिहास प्रस्थापित झाला की तुम्ही असुरक्षीकृत कार्डांचा पर्याय स्वीकारू शकता ज्यांच्यासाठी तारण आवश्यक नसते.

क्रेडिट मर्यादा तपासा

एखाद्या क्रेडिट कार्डावर देऊ केलेली क्रेडिट मर्यादा त्या व्यक्तीच्या उत्पन क्षमतेवर, पत (क्रेडिट) पार्श्वभूमीवर वगैरे आधारित असते. जास्त क्रेडिट मर्यादेची मदत तुम्हाला एक सातत्यपूर्ण पत उपयोजन गुणोत्तर राखण्यासाठी होते. पत उपयोजन गुणोत्तर अर्थात क्रेडिट युटिलायझेशन रेशो म्हणजे तुमच्या थकित शिलकीची एकूण पत मर्यादेशी तुलना होय. पत उपयोजन गुणोत्तर जास्त असेल तर त्याचा अर्थ असा की, तुम्हाला जास्त पतपुरवठ्याची भूक आहे आणि त्याचा तुमच्या पत गुणांकनावर (क्रेडिट स्कोअर) नकारात्मक परिणाम होतो. चांगला क्रेडिट युटिलायझेशन रेशो राखायचा असेल तर आदर्श परिस्थितीत तुमचा क्रेडिट कार्ड्‌सद्वारा केलेला खर्च एकूण क्रेडिट कार्ड लिमिट ३० टक्के पुढे जाता कामा नये. म्हणून जे क्रेडिट कार्ड जास्त पतमर्यादा (क्रेडिट लिमिट) देऊ करते त्याची निवड करा.

अदिल शेट्टी,

सीईओ, बँकबझार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2018 4:09 pm

Web Title: know how to pick the right credit card
Next Stories
1 गुगल ड्राईव्हवरही राहणार नाही आता व्हॉट्स अॅपचा डेटा सुरक्षित
2 चार कॅमेरे आणि 8 GB रॅम, OPPO चा नवा स्मार्टफोन
3 द ग्रेट ऑनर सेल ! अनेक स्मार्टफोन्सवर आकर्षक ऑफर्स
Just Now!
X