व्हॉट्सअॅपवरील अफवा पसरवणाऱे आणि खोटे संदेश रोखण्यासाठी व्हॉट्सअॅपने मोठे पाऊल उचलले असून भारतासाठी कंपनीने तक्रार निवारण अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. व्हॉट्सअॅपने कोमल लाहिरी या महिला अधिकाऱ्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. कोमल लाहिरी अमेरिकतूनच भारतातील व्हॉट्सअॅप मेसेजवर नजर ठेवणार आहेत. त्यामुळे आता व्हॉट्सअॅपवर फिरणाऱ्या फेक मेसेजसंदर्भात युजर्सना कोमल लाहिरी यांच्याकडे तक्रार नोंदवता येणार आहे.

व्हॉट्सअॅपकडून भारतासाठी तक्रार निवारण अधिकाऱ्याची नियुक्ती

भारतात गेल्या काही काळात अनेक अफवा पसरवणाऱ्या खोट्या मेसेजेसमुळे जमावाकडून मारहाणीच्या अनेक घटना घडल्या होत्या, यामध्ये मारहाण झालेल्या व्यक्तींचा बेदम मारहाणीमुळे मृत्यू झाला होता. या घटनानंतर भारताने व्हॉट्सअॅपला असे अफवांचे मेसेज रोखण्यासाठी प्रयत्न करण्यासंदर्भात चर्चा झाली होती. त्यानंतर व्हॉट्सअॅपने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे आता युजर्सना व्हॉट्सअॅप वापरताना काही मदत लागली तर त्यांनी मोबाईल अॅपवरून, मेलद्वारे किंवा पत्र लिहून मदत मागता येणार आहे.

यानिमित्ताने कोमल लाहिरी यांच्या नावाची चर्चा सुरु झाली असून त्यांच्याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊयात.

कोमल लाहिरी यांच्या लिंकडिनवरील प्रोफाइलनुसार, मार्च २०१८ पासून त्या व्हॉट्सअॅप सोबत ग्लोबल ऑपरेशन अॅण्ड लोकलायजेशनच्या सीनिअर डायरेक्टर म्हणून काम करत आहेत. त्यांना अर्थ आणि सुरक्षेचा चांगला अनुभव आहे.

व्हॉट्सअॅपच्या आधी त्यांनी फेसबुकसोबत काम केलं आहे. ऑगस्ट २०१४ मध्ये त्यांनी फेसबुकसोबत काम सुरु केलं. आधी त्यांना प्रोडक्ट प्लानिंग अॅण्ड ऑपरेशन ऑफ शेअर्ड सर्व्हिसेसच्या डायरेक्टपरदी नेमण्यात आलं. यानंतर त्यांना सीनिअर डायरेक्टर पद देण्यात आलं. जवळपास दोन वर्ष नऊ महिने कम्युनिटी ऑपरेशन्स अॅण्ड हेड ऑफ कम्युनिटी सपोर्टच्या सीनिअर डायरेक्टर म्हणून त्यांनी काम पाहिलं.

कोमल यांनी ग्लोबल ऑनलाइन पेमेंट कंपनी PayPal मध्येही सीनिअर डायरेक्टर म्हणून काम केलं आहे. सहा महिन्यांच्या कालावधीत त्यांनी अनेक पदांवर काम केलं. कोमल यांनी पुणे विद्यापीठातून बीकॉम केलं आहे. तर सेंट क्लारा युनिव्हर्सिटीतून एमबीए केलं.

कोमल लाहिरी यांना ईमेल किंवा एसएमएस करुन करु शकता संपर्क
फेसबुकच्या मालकीच्या असलेल्या व्हॉट्सअॅपने आपली वेबसाईटही अपेडट केली आहे. यामध्ये या तक्रार निवारण अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की, युजर मोबाइल अॅप किंवा ईमेलचा वापर करत कोमल यांच्याशी संपर्क साधू शकतात. यानंतर कोमल युजरची मदत करतील. कोमल लाहिरी यांना आधी फेसबुक आणि इन्स्टाग्राममध्ये काम केलं असून कम्युनिटी ऑपरेशनमध्ये सीनिअर डायरेक्टर राहिल्या आहेत. तिथे त्यांनी चार वर्ष काम केलं होतं.

कशी करायची तक्रार ?
युजर्ससाठी अॅपच्या सेटिंगमध्ये हेल्प फिचरमध्ये कॉन्टॅक्ट असा पर्याय देण्यात आला आहे. युजर या माध्यमातून थेट कंपनीच्या सपोर्ट टीमशी संपर्क साधू शकतात. जर त्यांना तक्रार पुढे न्यायची असेल तर थेट तक्रार अधिकाऱ्याशी संपर्क साधला जाऊ शकतो.

पुढील वर्षी भारतात निवडणुका येऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून खोटे मेसेज व्हायरल होऊ नयेत यासाठी सरकारने फेसबूक, व्हॉट्सअॅप, ट्विटर यांसारख्या सोशल मीडियांबाबत कडक पावले उचलली आहेत.