एका चाचणीत ८० टक्के डॉक्टरांचे मत; अपप्रवृत्ती रोखण्यासाठी कायदा हवा
देशातील आरोग्य व्यवस्था नफेखोरी व महागडे उपचार अशा दुष्टचक्रात अडकली आहे. मोठय़ा उद्योगांकडून चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयांमध्ये वैद्यकीय उपचारांमध्ये सेवाभावी वृत्तीचा अभाव असल्याचे मत ८० टक्के डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. या संदर्भात नोंदणीकृत डॉक्टरांच्या क्रुफे या संघटनेने चाचणी घेतली. त्यात प्राधान्याने डॉक्टरांनी याबाबत मतप्रदर्शन केले. या चाचणीत २५७० डॉक्टरांकडून प्रश्नावली घेण्यात आली. त्यात ८६.३८ टक्के जणांनी मोठी रुग्णालये (कार्पोरेट) वैद्यकीय सेवेबाबत प्रामाणिक नसल्याचे मत व्यक्त केले आहे.
आरोग्य क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात उद्योजकांनी यायला हवे. मात्र डॉक्टरांवर त्यांनी नियंत्रण ठेवू नये. हे स्पर्धेचे युग आहे, त्यामुळे जिव्हाळा थोडा कमी झाल्याचे मत अपोलोतील वरिष्ठ तज्ज्ञ डॉक्टर अनिल कोहली यांनी व्यक्त केले आहे. ८ टक्के डॉक्टरांनी मात्र याच्याशी असहमती दर्शवली आहे. अशा कोणत्याही चुकीच्या गोष्टी होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. डॉक्टर्स कोणतेही गैरकृत्य करत नाहीत. ते प्रामाणिकच आहेत. जेथे वैद्यकीय व्यवसायाचा उद्योगजगताशी संबंध येतो तिथे चित्र वेगळे आहे. मात्र डॉक्टरांची काही तत्त्वे असतात असे डॉक्टर विजय अरोरा यांनी सांगितले. ४.६६ टक्के डॉक्टरांनी उद्योगजगत वैद्यकीय व्यवसायात येण्याने होणाऱ्या परिणामांबाबत काहीच मत व्यक्त केलेले नाही.
रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी आरोग्य क्षेत्रात उद्योगजगताचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्याने स्पर्धा राहते व रुग्णांना चांगली सेवा मिळते. मात्र व्यवसायातील गैरप्रकार रोखण्यासाठी कडक कायदे गरजेचे असल्याचे मत क्रुफेचे सहसंस्थापक निपुण गोयल यांनी व्यक्त केले आहे.