रात्री कमी झोप घेतल्यामुळे केवळ तुमचे डोळेच सुजत नाहीत तर,  तुम्ही वयोवृध्द आणि उदास दिसण्यास कमी झोप कारणीभूत ठरू शकते. इतक्यात करण्यात आलेल्या एका अभ्यासामध्ये ही बाब समोर आली आहे.
निद्रानाशामुळे व्यक्ती उदास व मरगळलेल्या दिसतात, असे हा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. कमी झोपेमुळे व्यक्तिच्या चेहऱ्यावर मोठा परिणाम होतो. कमी झोपेचा डोळे, तोंड आणि त्वचेवर परिणाम होतो. झोप न झालेल्या व्यक्ती अत्यंत पेंगलेल्या दिसतात. झोप न झाल्यामुळे डोळे रक्ताळलेले, सुजलेले दिसतात. त्या व्यक्तिंच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे पडतात असे संशोधन स्टॉकहोम, स्विडन स्थित कारोलिन्स्का संस्थेच्या शास्त्रज्ञांनी केले आहे.
कमी झोपेचा परिणाम त्वचेवर देखील होतो. निद्रानाश झालेल्या व्यक्तिची त्वचा निस्तेज होत जाते. त्यांच्या चेहऱ्यावर सुरकूत्या पडून, तोंडाच्या कडा सतत कोरड्या पडतात.           
“मानवी चेहरा बोलका असतो. एकमेकांशी संवाद करताना चेहऱ्यावरील हावभाव मोठी भूमिका बजावतात. एखादी मरगळलेली व्यक्ती दिसल्यास त्याच्याशी संवाद साधणारी व्यक्ती देखील निरूत्साही होते”, असे स्टॉकहोम विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाची विद्यार्थीनी, प्रतिभावान लेखिका व संशोधक टीना संडलिन म्हणाली.
झोप न झालेल्या व्यक्तीच्या निस्तेजपणामुळे त्यांच्या चेहऱ्यावर विश्वासार्हता, आक्रमकपणा व सक्षमता या गोष्टींचा अभाव जाणवतो, असे या अभ्यासातून समोर आले आहे. झोप न झालेल्या दहा व्यक्तिंची दोन वेगळ्या प्रसंगी २० छायाचित्रे घेऊन त्यांचा अभ्यास करण्यात आला. हा अभ्यास ‘झोप’ य़ा नियतकालिकामध्ये प्रसिध्द करण्यात आला आहे.