अमेरिकी आरोग्यतज्ज्ञांचे मत
उत्तम आरोग्यासाठी दररोज सात ते आठ तास झोप आवश्यक आहे. परंतु धकाधकीचे जीवन आणि आधुनिक जीवनशैली यांमुळे अनेकांची पुरेशी झोप होत नाही. कित्येकांना निद्रानाश जडतो, तर अनेक जण केवळ तीन ते चार तास झोप घेतात. जर दररोज पाच तासांपेक्षा कमी झोप होत असेल, तर त्या व्यक्तीला मूत्रपिंडात (किडनी) बिघाड होऊ शकतो, असा दावा अमेरिकी वैद्यकीय तज्ज्ञांनी केला आहे.

दररोज पाच तासांपेक्षा कमी झोप होत असेल, तर तुमचे मूत्रपिंड निकामी होऊ शकते, असे सॅड दिआगो येथे भरलेल्या वैद्यकीय परिषदेत बोस्टन येथील डॉक्टरांनी सांगितले. या डॉक्टरांनी गेल्या दहा वर्षांत तब्बल चार हजार रुग्णांचा अभ्यास केला. त्यातील जे लोक केवळ चार ते पाच तास झोप घ्यायचे, त्यांना मूत्रपिंड विकार जडल्याचे दिसून आले. सात ते आठ तास झोप घेणाऱ्या लोकांमध्ये मूत्रपिंडाचा कोणताही आजार आढळलेला नाही. कमी झोप घेणाऱ्या ६५ टक्के व्यक्तींचे मूत्रपिंड कालांतराने निकामी झाले, असे डॉ. सिआरान जोसेफ यांनी सांगितले.

जोसेफ हे संशोधन करणाऱ्या या पथकाचे नेतृत्व करत आहेत. झोपेचा परिणाम मूत्रपिंडावर होऊ शकतो, हे सांगणारे हे महत्त्वपूर्ण संशोधन असून, भविष्यात वैद्यकीय शास्त्रासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो, असे जोसेफ यांनी सांगितले.
सध्या अनेकांना निद्रानाश हा विकार जडलेला आहे. ताण-तणाव, रात्री दीर्घ वेळ काम करणे, सोशल मीडियावर सतत कार्यरत असणे आदी कारणांमुळे अनेक जण कमी झोप काढतात. त्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. मूत्रपिंडविकार, हृदयविकार, मधुमेह आदी विकार कमी झोपेमुळे जडतात, असे डॉक्टरांनी सांगितले.