अपुरी झोप झाल्यास व्यक्तीची चेहरे ओळखण्याची क्षमता कमी होते असे एका अभ्यासात दिसून आले आहे.

ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स विद्यापीठ आणि ब्रिटनमधील ग्लास्गो विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी या संदर्भात नवे संशोधन केले आहे. त्याचे निष्कर्ष रॉयल सोसायटी ओपन सायन्स नावाच्या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत.

दैनंदिन जीवनातील किंवा कामाचा तणाव, रात्रपाळीत काम करणे, आजारपण अशा अनेक कारणांमुळे रात्री पुरेशी झोप मिळत नाही. त्याच्या परिणामांचा सामान्यपणे फारसा गंभीर विचार केला जात नाही; पण त्याचे गंभीर परिणाम होत असल्याचे या संशोधनातून दिसून आले आहे. आजवर स्मृती कमी झाल्याने माणसे ओळखण्याची क्षमता कमी होते हे दिसून आले होते; पण अपुऱ्या झोपेमुळेही हा परिणाम होतो हे लक्षात आले नव्हते. ते या अभ्यासात स्पष्ट झाले. शास्त्रज्ञांनी या अभ्यासात सहभागी झालेल्या आणि कमी झोप झालेल्या व्यक्तींना संगणकाच्या स्क्रीनवर एकाच व्यक्तीची किंवा भिन्न व्यक्तींची छायाचित्रे दाखवली. झोप अपुरी झालेल्या व्यक्ती हे अत्यंत साधे वाटणारे कामही नीट करू शकल्या नाहीत. मात्र त्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासात कुठेही कमतरता आलेली नव्हती. त्यांनी चुकीची उत्तरेही त्याच आत्मविश्वासाने ठासून सांगितली. ही बाब शास्त्रज्ञांना धोक्याची वाटते.

पोलीस, पासपोर्ट कार्यालयातील अधिकारी, सुरक्षा दलांमधील व्यक्ती, विमानतळांच्या कस्टम आणि इमिग्रेशन विभागातील अधिकारी यांच्याबाबतीत या चुका गंभीर ठरू शकतात. त्याहीपेक्षा चूक होऊनही ती मान्य करता दामटून रेटण्याची वृत्ती घातक ठरू शकते. त्यामुळे या संशोधनाचे महत्त्व अधिक असल्याचे या अभ्यासाचे प्रवर्तक डेव्हिड व्हाइट आणि लुईस बीटी यांनी सांगितले.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)