जर तुम्ही गरजेपेक्षा कमी झोप घेत असाल तर सावधान, त्यामुळे तुमच्या मूत्रपिंड कार्यक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पुरेशी झोप घेणे अत्यावश्यक असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

कमी झोपेमुळे रुग्णाच्या मूत्र कार्य, दीर्घकालीन मूत्रपिंड आजार यासह झोपेचे विकार होतात. शिकागोमधील इलिनोइस विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासामध्ये ४३२ प्रौढांची मूत्रपिंड आजाराबाबत तपासणी केली असता त्याची काही कारणे अपुऱ्या झोपेशी संबंधित असल्याचे दिसून आले.

[jwplayer vtVpMCjf]

सहभागी झालेल्या रुग्णांनी घेतलेली एकूण झोप, तिचा दर्जा, झोपण्याची वेळ यासाठी त्यांच्यावर पाच ते सहा दिवस लक्ष ठेवण्यात आले. तसेच त्यांच्या आरोग्याबाबतची पाच वर्षांची माहितीही घेण्यात आली.

यामध्ये सहभागी झालेले रुग्ण हे रात्री सरासरी ६.५ तास झोप घेत होते. यातील ७० जणांची मूत्रपिंड निकामी आणि ४८ जणांचा मृत्यू झाल्याचे अभ्यासात दिसून आले. जर रात्रीच्या झोपेची वेळ अतिरिक्त एका तासाने वाढवली तर मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका १९ टक्क्यांनी कमी होत असल्याचे संशोधकांना दिसून आले.

जे रुग्ण रात्रीच्या तुलनेत दिवसा झोप घेतात त्यांच्यामध्ये मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका १० टक्क्यांनी जास्त असतो. कमी झोप आणि झोपण्याच्या अनियमित वेळा यामुळे मूत्रपिंड संबंधित आजार होण्याचा धोका जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे पुरेशी झोप आणि झोप घेण्याच्या सवयीमध्ये आवश्यक ते बदल करण्याची गरज असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.) 

[jwplayer VwmkQGEJ]