07 March 2021

News Flash

फॅशनबाजार : पारंपरिक पोशाखाची नवी नवलाई..लटकन!

वस्त्रालंकार म्हणून मोठय़ा प्रमाणात वापरला जाणारा ‘लटकन’ हा त्यातलाच एक प्रकार आहे.

परंपरा कितीही चांगली आणि अभिजात असली तरी त्यात काळानुरूप बदल हे करावेच लागतात. किंबहुना परंपरेतील अस्सलता या बदलांमुळे नव्याने उजळून निघत असते. साहित्य, संगीत, कला आदी सर्वच क्षेत्रांत हे घडत असते. माणसांच्या सामाजिक जीवनाशी थेट संबंध असणारे फॅशन विश्वही त्याला अपवाद नाही. आपल्याकडे पारंपरिक पोशाखांमध्ये कमालीची विविधता आहे. मात्र त्या त्या काळात त्या परंपरेला नवतेची जोड दिल्यानेच त्यातील ताजेपणा कायम आहे. सध्या वस्त्रालंकार म्हणून मोठय़ा प्रमाणात वापरला जाणारा ‘लटकन’ हा त्यातलाच एक प्रकार आहे.

परंपरेतील अभिजातता कायम ठेवून त्यातील तोचतोचपणा टाळण्यासाठी त्याला काळानुरूप नावीन्याची जोड दिली जात असते. कला, साहित्य, संगीत आदी सर्वच क्षेत्रांत असे बदल होत असतात. रामायण आणि महाभारत या महाकाव्यांच्या कित्येक आवृत्त्या आपल्याकडे आल्या. जुन्या चित्रपटांचे रीमेक आपण पाहतो. फॅशन विश्वातही नेमके हेच घडत असते. पारंपरिक वस्त्रालंकारातला मूळ गाभा कायम ठेवून त्यात थोडे बदल केले जात असतात.

आपल्याकडे साडी, चनिया चोली, घागरा, लेहंगा, पंजाबी ड्रेस, चुणीदार असे प्रांतिक वैविध्य असलं तरीही त्यातही एक साचेबद्धता येते. मग त्यामध्ये जरा वेगळेपणा आणण्यासाठी आपण एखाद्या अ‍ॅक्सेसरीजकडे वळतो. हल्ली पारंपरिक पोशाखाला अधिक देखणेपणा आणण्यासाठी ‘लटकन’चा वापर होताना दिसून येते. छोटे छोटे मणी, लहान-मोठय़ा आकाराचे रेशमी गोंडे, घुंगरू, झुमके आणि बरेच काही या लटकनमध्ये दिसून येते. पारंपरिक पोशाखाला नवा लूक देण्यासाठी आता लटकन हा महत्त्वाचा अंलंकार झाला आहे.

विशेषत: सण-समारंभांमध्ये वापरल्या जाणाऱ्या खास कपडय़ांमध्ये ‘लटकन’च्या सजावटीला विशेष महत्त्व दिलेले दिसते. पारंपरिक पोशाखामध्ये प्रथम क्रमांक लागतो तो साडीचा. सध्या साडीच्या पदराला व ब्लाऊजला लटकन लावण्याची फॅशन आहे. उत्सवांमध्ये ब्लाऊजच्या मागच्या बाजूला लटकन लावून मिरवणाऱ्या मुली तुम्हाला दिसतील. ब्लाऊजला वेगळा लूक देण्याचे काम हे लटकन करत असल्यामुळे त्याच्या किमतीही बऱ्यापैकी आहेत. लटकन असलेला ब्लाऊज घातला असला आणि केस लांब असले तरी फक्त लटकन दिसण्यासाठी केस पुढे घेतले जातात. तसेच केसांची हेअर स्टाइल अशी करतात की ज्याने त्यांची महागडी किंवा स्वस्त लटकन सगळ्यांच्या नजरेत भरेल. केसांचा अंबाडा तरी घालतात किंवा बटा सोडून वर बांधले जातात. अशा प्रकारे खास लटकन मिरविण्यासाठी केसांच्या वेगवेगळ्या रचना केल्या जातात. एकंदरीत काय तर लटकन दिसायला हवी.

लटकन कुठे वापरू शकता.. ?

लटकनचा वापर फक्त कुर्ता किंवा ब्लाऊजवरच नव्हे तर इतरत्रही करता येतो.  इतर वस्त्रप्रावरणांची शोभाही लटकनद्वारे वाढविता येते. आपल्याला हे लटकन घागरा, कुर्ता, ब्लाऊज, पदर, स्कार्फवरही वापरता येतात. लटकनमध्ये सध्या भरपूर व्हरायटी बघायला मिळते. फक्त आकारामध्येच नाही तर रंगांमध्येही वैविध्य दिसून येते. रंगांमध्ये नियॉन कलर्स मोठय़ा प्रमाणावर दिसताहेत. सध्या टी-शर्ट असो किंवा हेअर क्लिप्स सगळ्यांवर नीऑन कलरचे राज्य आहे. गेल्या वर्षी गणपतीचे पितांबरही नीऑन कलरचे पाहायला मिळाले. मग लटकनने तरी का मागे राहावे? प्लेन अर्दी कलरच्या ड्रेसवर निऑन कलरचे लटकन. असे कॉम्बिनेशन अगदी भन्नाट दिसते. वेगवेगळ्या आकाराचे कलरफुल लटकन तुमच्या प्लेन कुर्त्यांला अगदी आकर्षक आणि फ्रेश बनवतात हे नक्की.

वेस्टर्न पोशाखाला गोंडय़ांची झालर. 

वस्त्रलंकार केवळ पारंपरिक पोशाखापर्यंत मर्यादित न राहता आता वेस्टर्न पोशाखावरही शोभून दिसतात. सध्या बाजारामध्ये टॅझलस् म्हणजेच रंगीबेरंगी गोंडा असलेल्या कपडय़ांची गर्दी दिसून येते. टॅझलची झालर असलेले ड्रेस किंवा नाडीला गोंडा असलेले टॉप तरुणींना भुरळ घालत आहेत. तसेच कुर्ताबरोबरच मडीच्याही नेकलाइनची शोभा वाढविण्यासाठी गोंडय़ांचा वापर केला जातो.

लटकन निवडताना..

बाजारात लटकनचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. त्यामध्ये काही हलके तर काही अगदीच वजनदार असतात. त्यामुळे कोणते लटकन कुठे वापरावेत याची विशेष काळजी घावी. ब्लाऊज अगदीच भारदस्त असल्यास त्यावर जड असे हिऱ्यांचे किंवा मोत्यांचे लटकन शोभून दिसतात. तसेच घागऱ्यासाठी लटकन निवडताना चोळीच्या रंगाशी साम्य असणारे किंवा घागऱ्याच्या बॉर्डरच्या रंगाचे लटकन घ्यावेत. सध्या बाजारांमध्ये घागऱ्यासाठी मोठय़ा आकाराचे लटकन उपलब्ध आहेत. तसेच स्कार्फवर जर लटकन लावायचे झाल्यास लाइट वेटेड म्हणजेच हलके-फुलके असे रंगीबेरंगी गोंडे हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

कुठे मिळतील.. ?

मुंबईमध्ये दादर, बांद्रा हिल रोड, तसेच गोरेगाव, बोरीवली, मालाड स्टेशन पश्चिमेला टेलरिंगचे साहित्य विक्री करणारी अनके  दुकाने आहेत. १० रुपयांपासून ते १००० रुपयांपर्यंतचे लटकन येथील दुकांनामध्ये मिळतात.

लटकनचे प्रकार..

हल्ली बाजारांमध्ये अनेक प्रकारचे लटकन उपलब्ध आहेत. त्यामध्ये रंगीबेरंगी मण्यांचा वापर करून तयार केलेले लटकन, तसेच धातूंपासून तयार केलेल्या कलाकृती, गोंडे यांसारखे अनेक प्रकार सध्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत. पूर्वी ब्लाऊजच्या उरलेल्या कापडापासून त्रिकोणी आकारचा गोंडा तयार करून तोच ब्लाऊच्या नाडीला लावला जात असे. आता हीच क्लृप्ती वेगळ्या प्रकारे अमलात आणून काही डिझायनर्सनी कापडाचे छोटे मोर, चिमण्या, पोपट, हत्तीच्या निरनिराळ्या आकाराचे लटकन तयार केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2016 1:50 am

Web Title: latkan fashion for traditional dress
Next Stories
1 सध्याच्या अंदाजापेक्षाही भारतात क्षयरोगींची संख्या अधिक
2 उभे राहण्याची शिक्षा तुमचे वजन घटवेल
3 लिंबूवर्गीय फळांमुळे लठ्ठपणावर मात
Just Now!
X