डॉ. शुभांगी महाजन

शरीरावर अनेकदा पांढरे डाग दिसतात. सामान्य भाषेत याला ‘कोड’ किंवा ‘श्वेतकुष्ठ’ असेही संबोधतात. हे पांढरे डाग जर शरीराच्या उघडय़ा भागावर असले तर मग रुग्णाचा आत्मविश्वास कमी होतो आणि त्याच्यात न्यूनगंड निर्माण होतो. जगभरात जवळपास एक ते चार टक्के लोकांना कोड झालेला आहे.

कोड का होतो?

कोड ही एक रंगविकृती आहे. यामध्ये त्वचेच्या खालच्या स्तरामधील मेलानीन नामक पेशी काही कारणांमुळे नष्ट होऊ  लागतात, ज्यामुळे त्वचेतील रंगद्रव्याचे प्रमाण कमी होऊन त्या ठिकाणची त्वचा पांढरी पडते. याची काही कारणे खालीलप्रमाणे आहेत –

ऑटो-इम्युनिटी

कोड हा एक ऑटो-इम्युन डिसऑर्डर आहे, ज्यात शरीरातील रोगप्रतिरोधक क्षमता शरीरातील रंगपेशींविरुद्ध कार्य करू लागते आणि त्यांना नष्ट करते.

आनुवंशिकता

जर कुटुंबामध्ये कोणाला कोड असेल तर २० ते ३०% शक्यता असते की हा आजार पुढच्या पिढीतही दिसून येईल. अनेकदा घरात कोणालाही हा आजार नसतानाही एखाद्याला होऊ  शकतो.

औद्योगिक रसायनांचा संपर्क

*  शरीरातील नसांमधून विशिष्ट एका रासायनिक पदार्थामुळे रंगपेशींना इजा पोचते व त्या नष्ट होतात.

*  सततचा मानसिक व शारीरिक ताण यांमुळे शरीरावर कोडचे प्रमाण वाढू शकते.

कोडची लक्षणे

*  त्वचेचा रंग कमी होऊन पांढरे डाग तयार होणे.

*  केस अकाली पांढरे होणे.

*  आपल्या ओठांच्या आत आणि नाकाच्या आत असलेल्या त्वचेच्या उतीमध्ये रंग कमी होणे.

*  सूर्यप्रकाशाच्या दीर्घ संपर्कात आल्यामुळे वेदना होणे किंवा खाज येणे.

पांढरे डाग हे संसर्गजन्य नाहीत, म्हणजे एका व्यक्तीच्या स्पर्शाने दुसऱ्या व्यक्तीला होत नाहीत. तसेच आपल्या आहाराशीही याचा काहीही संबंध नसतो.

हे पांढरे डाग शरीराच्या कुठल्याही भागात येऊ  शकतात. उदा. त्वचा, केस (डोक्यावरचे आयब्रो, पापणीचे, दाढीचे), डोळे, तोंडाच्या आतील भाग, गुप्तांग. कोड कधीही व कोणालाही होऊ  शकतो. म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणालाही होऊ  शकतो. शरीराच्या कोणत्याही भागावर याची सुरुवात होऊ  शकते.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

त्वचाविज्ञानी शारीरिक तपासणी करून डागाचे परीक्षण करतात. कोडचे निदान करण्यासाठी वूड्स+लॅम्पचा उपयोग करता येतो. तसेच तुमच्या लक्षणांबद्दल, कुटुंबाबद्दल माहिती, इतर आजारांबद्दल विचारणा केली जाते. रक्ताच्या चाचण्या, थायरॉईड चाचणी, इतर ऑटोम्युन्यून परिस्थितीसाठी अँटीबॉडी चाचण्या, फोलेट किंवा व्हिटॅमिन बी १२ची चाचणी, ड जीवनसत्त्वाची पातळी.

उपचारपद्धती

कोडाच्या डागांवर उपचार होऊ  शकतो. पण या आजाराला जर मुळापासून नष्ट करायचे असेल तर मात्र तसा उपचार उपलब्ध नाही.

 काय काळजी घ्याल?

*  नियमित सनस्क्रीन लावा. जे यूव्हीए आणि यूव्हीबी सूर्यकिरणांपासून संरक्षण करते.

*  तीव्र सूर्यप्रकाशापासून त्वचेचे रक्षण करा.

*  उन्हात बाहेर पडताना संरक्षक कपडे घाला.

प्रत्येक रुग्णाच्या उपचारांचा कालावधी भिन्न असू शकतो. त्यामुळे कोडाचे डाग दिसू लागताच वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्यानुसार उपचार करून घेणे कधीही उत्तम. उपचार दीर्घ कालावधीचे असले, तरी मध्येच कंटाळून सोडून देऊ  नयेत. थोडा संयम बाळगून उपचार केल्यास खात्रीशीर परिणाम दिसून येतो.