रात्री झोप न येण्याने ताण वाढून आत्महत्येचे विचार येतात व तसे प्रयत्नही केले जातात, असे नवीन अभ्यासात म्हटले आहे.

मँचेस्टर व ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी आत्महत्येच्या प्रवृत्तीशी झोपेचा संबंध यावर १८ जणांच्या मुलाखती घेतल्या. झोपेच्या समस्येतून आत्महत्येशी संबंधित विचार तीन प्रकारे येतात. एकतर झोपेतून अचानक जाग येण्याने रुग्ण घाबरून तसे करू शकतो, त्या वेळी त्याच्याक डे ती कृती टाळण्यासाठी साधने नसतात. रात्री चांगली झोप येत नसेल तर आयुष्य कठीण बनते व त्यातून नैराश्य, नकारात्मक विचार, एकाग्रतेत बाधा व निष्क्रियता येते. झोपेमुळे आत्महत्या टळू शकतात. पण त्यामुळे दिवसा झोपण्याचे प्रमाण वाढते, त्यामुळे उलट रात्रीची झोप विस्कळीत होते. मानसिक आरोग्यासाठी, आत्महत्या टाळण्यासाठी व वर्तनात्मक सुधारणांसाठी झोप आवश्यक असते. जे लोक रात्री जागतात म्हणजे ज्यांना झोप लागत नाही त्यांची आत्महत्येची शक्यता जास्त असते, असे मँचेस्टर विद्यापीठाच्या डोना लिटलवूड यांनी सांगितले. ‘जर्नल बीएमजे ओपन’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)