स्थुलत्त्व ही काही साधीसुधी समस्या नाही. काहीजणांच्या तर अक्षरश: पाचवीलाच जडत्त्व पुजलेले असते. बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव आदी कारणांमुळेही अनेकांचे वजन त्यांच्या आटोक्यात राहात नाही. जागतिक आरोग्य संघटनेने २००८ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार जगभरातील ३५ टक्के लोकसंख्या स्थूल म्हणजेच वजनाच्या समस्येने ग्रासलेली आहे. बहुतेक स्थूल व्यक्ती मनापासून स्वत:चे वजन कमी करण्याचा वेळोवेळी संकल्प करतात. मात्र त्यातील बरेचसे आरंभशूर ठरून नंतर ‘ये रे माझ्या मागल्या’ ठरतात. ठाण्यातील वर्तकनगरमध्ये राहणाऱ्या अक्षता जोशी आणि अंजली कुलकर्णी या दोघींनाही आपले वजन आहे त्यापेक्षा कमी करावे, असे वाटत होते आणि त्यासाठी आपापल्या परीने त्या प्रयत्नही करीत होत्या. मात्र त्यात त्यांना म्हणावे तसे यश येत नव्हते. अखेर आपल्यासारख्या देहाचे ओझे कमी करण्याच्या विवंचनेत असणाऱ्यांचा स्व-मदत गट करून सामूहिकरीत्या वजन घटविण्याची कल्पना त्यांनी मांडली. त्याला त्यांच्या विभागातूनच चांगला प्रतिसाद मिळाला. वर्तकनगरमधील एकूण नऊजणांनी वजन कमी करण्याच्या सामूहिक अभियानात सहभागी होण्याचे ठरविले. सकाळ-संध्याकाळचा नियमित व्यायाम, योगासने, धावणे अथवा चालणे, आहार नियंत्रण आदी उपायांनी त्यांनी वजन घटविण्यास सुरुवात केली. त्यांच्या या स्थुलत्त्व निवारण मोहिमेविषयी समजल्यानंतर ठाण्याच्या विविध भागांतील आणखी ६८ जण या उपक्रमात सहभागी झाले. २० ते ६५ वयोगटातील स्त्री-पुरुष या मोहिमेत सहभागी झाले असून त्यात स्त्रियांची बहुसंख्या आहे. या सर्वानी सामूहिकरीत्या पाच आठवडय़ांत २०० किलो वजन घटविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पहिल्या आठवडय़ात एकूण ४० किलो वजन घटविण्यात त्यांना यश आले आहे. विशेष म्हणजे ही सर्व मोहीम विनामूल्य तत्त्वाने चालवली जाते. ‘एकमेका साहाय्य करू, अवघे घटवू वजन’ अशा या आगळ्या चळवळीचे नाव आहे- फिटनेस प्राइड.
कळणारे वळावे म्हणून..
अक्षता जोशी म्हणतात, ‘कळते पण वळत नाही तसेच एकेकटय़ाने केल्या जाणाऱ्या स्थुलत्त्व निवारण मोहिमेचे होते. सातत्याचा अभाव, व्यायामाचा कंटाळा, न आवरता येणारी भूक आणि नैराश्यामुळे अनेकजण उलट वजन कमी करण्याऐवजी वाढवून बसतात. स्व-मदत गटामुळे एकमेकांचा आधार मिळून निश्चयाला धरून राहणे शक्य होते. त्यामुळे आम्हाला आता कळते आणि वळतेही असे आम्ही अभिमानाने म्हणू शकतो.’
प्रोत्साहनपर पारितोषिके
सध्या दर शनिवारी संध्याकाळी सहा वाजता वेदांत संकुलातील सभागृहात फिटनेस प्राइडचे सदस्य एकत्र येतात. त्या दिवशी प्रत्येकाला  पुढील आठवडय़ाचा आहार आणि व्यायामाचे कोष्टक ठरवून देण्यात येते. सर्व सभासद त्याचे पालन करतात. एकाच संकुलातील विविध छोटे गट दररोज एकत्रपणे व्यायाम करतात. पुन्हा पुढील शनिवारी प्रत्येकाच्या वजनाची नोंद घेऊन  कुणी, किती घटविले हे पाहिले जाते. सात दिवसांत सर्वाधिक वजन घटविणाऱ्यांना प्रोत्साहनपर पारितोषिक दिले जाते.  
तज्ज्ञांचे मार्गदर्शन
प्रत्येकालाच आपले वजन घटावे असे वाटत असले तरी कुणाचे आणि किती वजन घटवायचे हे तज्ज्ञ डॉक्टर्सच सांगू शकतात. फिटनेस प्राइड समूहालाही आहारतज्ज्ञ डॉ. दीपाली आठवले तसेच व्यायामतज्ज्ञ डॉ. बिजू शन्मुघन आणि अंजना शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले आहे.