देशातील बेरोजगारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआययसी) च्या वतीने ‘असिस्टंट’ पदाच्या तब्बल आठ हजार जागासांठी भरतीची जाहिरात देण्यात आली आहे. एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटवर याबाबत माहिती देण्यात आलेली आहे. पात्र उमेद्वारांकडून यासाठी ऑनलाइन अर्ज देखील मागवण्यात आले आहेत. एलायसीच्या देशभरातील सर्व विभागीय कार्यालयांमध्ये ही पदं भरली जाणार आहेत.

एलआयसी असिस्टंट पदावरील कर्मचाऱ्यास एलआयसीच्या विविध शाखांमध्ये लिपीकवर्गीय कामं जसे की कस्टमर सर्व्हिस एक्झिकेटिव्ह, कॅशियर, सिंगल विंडो ऑपरेटर आदी ठिकाणी कामं करावे लागते. या पदासाठी ऑनलाइन नोंदणीस १७ सप्टेंबरपासून सुरूवात झाली आहे तर १ ऑक्टोबर २०१९ ही शेवटची तारीख आहे. या पदासाठी मासिक वेतन १४ हजार ४३५ रुपये असणार आहे. निवडप्रक्रिया दोन संगणक आधारित चाचण्यांवर (सीबीटी) असेल, त्यानंतर उमेदवारांची भरतीपूर्व वैद्यकीय तपासणी केली जाईल. उमेदवारांनी एलआयसीच्या केवळ एकाच विभागासाठी अर्ज करावा, एक पेक्षा जास्त अर्ज केल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो. शिवाय अर्जदारांनी एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटला निवडप्रक्रियेदरम्यान ऑनलाइन परिक्षेच्या तारखा व अन्य माहितीसाठी वेळोवेळी भेट देणे अपेक्षित आहे.

उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी. तसेच दिलेल्या सुचनांप्रमाणे अर्ज सादर करावा. अर्जदारास यात मदतीसाठी एलआयसीकडून अधिकृत पेजची देखील सोय करण्यात आली आहे, त्यातील माहितीच्या आधारे अर्ज करता येऊ शकतो. अर्जात मागवण्यात आलेली सर्व आवश्यक माहिती अर्जदाराने नमूद करणे बंधनकारक आहे. आवश्यक माहितीची पुर्तता केलेली नसल्यास अथवा उमेदवार अपात्र आढळल्यास अर्ज कोणत्याही क्षणी बाद ठरवला जाईल.

एससी / एसटी प्रर्वगासाठी ५० रूपये अधिक व्यवहार शुल्क तर अन्य प्रवर्गातील उमदेवारांसाठी ६०० रुपये अधिक व्यवहार शुल्क अर्जाबरोबर आकारले जाणार आहे.