आयआयटी खरगपूर या संस्थेने जीवनरक्षक तंत्रज्ञान विकसित केले असून ही यंत्रणा रुग्णवाहिकेत बसवल्यानंतर कुठूनही डॉक्टरांना रुग्णाच्या प्रकृतीवर लक्ष ठेवता येते. काही वेळा रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी प्रकृती धोक्यात येऊ शकते. त्यावर ही प्रतिबंधात्मक योजना ठरू शकते. आयआयटी खरगपूरच्या प्रवक्त्याने सांगितले, की या नवीन तंत्रज्ञानाचे नाव अ‍ॅम्ब्युसेन असे असून ते संस्थेच्या संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागाच्या स्वान या प्रयोगशाळेने तयार केले आहे. अ‍ॅम्ब्युसेन यंत्रणेत बिनतारी पद्धतीने इसीजी, हृदयाचे ठोके, रक्तदाब व इतर घटकांवर लक्ष ठेवता येते शिवाय रुग्णाची माहिती गोपनीय ठेवली जाते. यात क्लाऊड कॉम्प्युटिंगची मदत घेतली जाते. दूर वैद्यकापेक्षा हे तंत्रज्ञान प्रगत असून यात डॉक्टर रुग्णांना बघू शकतात एवढेत नव्हे तर त्यांच्या प्रकृतीची सगळी माहिती घेऊ शकतात. यात ग्राफिकल इंटरफेसचा वापर केलेला आहे. रिअर टाइम इसीजी ग्राफ रेंडरिंगसारखी साधने यात आहेत. इंटरनेट जोडणी असलेला लॅपटॉप, टॅबलेट, स्मार्टफोन यांच्या मदतीने यात माहिती घेता येते. रुग्णाला वाहिकेतून नेले जात असताना त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणारे कुठलेही तंत्रज्ञान सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांना ते वरदान आहे. असे प्रा. सुदीप मिश्रा यांनी सांगितले. अ‍ॅम्ब्युसेन यंत्रणेत शरीर संवेदक, सेल्युलर सेवा, वायरलेस तंत्रज्ञान (वायफाय), क्लाऊड कॉम्प्युटिंग यांचा वापर केला जातो. इंटरनेट कनेक्शन फार चांगले नसेल, तरी ही यंत्रणा काम करू शकणार आहे. भुवनेश्वर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्र व बी. सी. रॉय हॉस्पिटल येथे यांच्या चाचण्या घेतल्या आहेत. आयसीयूत दाखल करण्यात आलेल्या रुग्णांवर चाचण्या झाल्या असून त्या यशस्वी झाल्या आहेत, असे मिश्रा यांनी सांगितले.