शेफ नीलेश लिमये

दिवाळीच्या दिवसात ४-५ दिवस सातत्याने गोडाधोडाचे पदार्थ खाण्यास मिळत असतात. त्या कोणाच्याही घरी गेल्यावर हातावरदेखील गोड पदार्थच ठेवला जातो. मात्र वारंवार गोड पदार्थ खाऊन कंटाळा येतो. अशावेळी काही तिखट किंवा चटपटीत खावसं वाटतं. त्यामुळे पालक पकोडा चाट हा उत्तम पर्याय आहे. विशेष म्हणजे पकोडा चाट म्हटलं तरी तो तितकाच हेल्दीदेखील आहे. त्यामुळे हा पालक पकोडा चाट कसा करायचा ते पाहुयात.

साहित्य –
पालकाची १० पाने
बेसन- ३-४ टीस्पून
दही- १ कप
साखर- चवीनुसार
चिंचेची चटणी- चवीनुसार
तिखट- चवीनुसार
सैंधव- चवीनुसार
जिरे पावडर- चवीनुसार

कृती –
पालकाची मोठी पाने स्वच्छ धुऊन कोरडी करून घ्या. बेसन पिठात पाणी घालून ते भजीच्या पिठाप्रमाणे तयार करून घ्या. आता पालकाची पाने या पिठात बुडवून काढा आणि सोनेरी रंगावर तळून घ्या. दही एका वेगळ्या भांडय़ात घेऊन त्यात साखर घाला. एका प्लेटमध्ये तळलेली पालकाची पाने ठेवा. त्यावर गोडूस दही, चिंचेची चटणी पसरा. सैंधव, लाल तिखट, जिरे पावडर भुरभुरा. गरमगरमच खायला द्या.

शेफ नीलेश लिमये