डॉ. समीर गर्दे

वातावरणातील बदलाचा परिणाम हा कायम आपल्या शरीरावर होत असतो. यामध्ये अनेकांना ऋतू बदलला किंवा हवामान बदललं की त्यांना काही शारीरिक व्याधी सुरु होतात. यामध्येच अनेकांना श्वसनसंस्थेशी निगडीत समस्या निर्माण होताना पाहायला मिळतात. अनेकांना धूळ, माती यांची अॅलर्जी असते. तर काहींना दमा, बालदमा या सारखे जुनाट आजारही असतात. त्यामुळे या व्यक्तींनी कायम स्वत: ची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे श्वसनसंस्थेसंबंधीत आजार असलेल्या व्यक्तींनी ऋतुमानात बदल झाल्यानंतर विशेष काळजी घेतली पाहिजे.

श्वसनविकारग्रस्तांनी घ्या ‘ही’ काळजी

१. कायम हात स्वच्छ ठेवावेत. कारण आपल्या हाताचा संबंध थेट आपल्या चेहऱ्याशी येत असतो. बऱ्याच वेळा आपण हात नाकाला, चेहऱ्याला लावत असतो. त्यामुळे हात कायम साबण आणि पाण्याचा वापर करून धुवा.

२. खोकताना किंवा शिंकताना आपले तोंड आणि नाक रुमालाने झाका. रुमाला वापरत नसाल तर हाताच्या कोप-याचा वापर करूनही तोंड झाकू शकता.

३. रस्त्यावर कुठेही थुंकू नका. जर कोणी असे करत असेल तर कृपया त्यांनाही असे करण्यापासून थांबवा.

४. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे वेळेवर घ्या आणि त्यांचा पुरेसा साठा देखील करुन ठेवा.

५. नियमित योग करा. श्वसनाशी निगडीत प्राणायम करा आणि धूळ, माती, प्रदूषण यापासून दूर रहा.

६. पोषक आहाराचे सेवन करा. सफरचंद, ओमेगा -3 चा समावेश असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा.  जसे अक्रोड, सोयाबीन हे आपल्या फुफ्फुसांच्या आरोग्यांसाठी उपयुक्त ठरतात.बेरी, पपई, अननस, किवी, कोबी, गाजर, हळद आणि आले यासारखे पदार्थ रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. घशाच्या आरोग्यासाठी मधाचा देखील वापर करा. तसेच, भरपूर पाणी प्या.

७. वजन  वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करा. मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. मेडिटेशन सारख्या पर्यायाचा वापर करा.

८. पाण्याची वाफ घ्या. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करा.

९. धुम्रपान करणे टाळा. तसेच पॅसिव्ह स्मोकींगपासूनही दूर रहा.

(डॉ. समीर गर्दे हे मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये पल्मनोलॉजिस्ट आहेत.)