इन्स्टाग्राम हे फोटोशेअरिंग अॅप अल्पावधितच बरंच लोकप्रिय झालं. फेसबुकची मालकी असलेले हे अॅप्लिकेशन तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. सुरुवातीला केवळ फोटो शेअरिंग एवढाचा मर्यादीत असणारा वापर कालांतराने वाढला. या अॅपचा आता व्यावसायिक कारणासाठीदेखील वापर होऊ लागला आहे. इन्स्टाग्रामने तरुण उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. याच इन्स्टाग्राममुळे अनेक ब्लॉगरही हिट झाले. आपलं अॅप सगळ्यांपेक्षा वेगळं आणि लोकप्रिय ठरावं यासाठी कंपनी सातत्याने प्रयत्न करत असते. युजर्सचा वापर जास्तीत जास्त सोपा व्हावा यासाठी नवनवीन बदल करण्यात येतात. अशीच एक नवी सुविधा इन्स्टाने आणली आहे, आता युजर्सना इन्स्टाग्रामच्या माध्यमातून व्हॉइस मेसेज करता येणार आहे.

आता सर्वांना व्हॉटसअॅपप्रमाणे इन्स्टाग्रामवर व्हॉइस मेसेज पाठवता येणार आहे. अंड्रॉईड आणि अॅपल अशा दोन्ही युजर्ससाठी हे नवीन फिचर कार्यरत असेल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. मात्र ही सुविधा मिळण्यासाठी युजर्सना सर्वात आधी हे अॅप अपडेट करावे लागणार आहे. यासाठी चॅट या पर्यायामध्ये युजर्सना आता एक माईकचे चिन्ह दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला व्हॉइस मेसेज करता येणार आहे. या व्हॉइस मेसेजमध्ये काही गडबड झाल्यास जावीकडे स्वाईप केल्यावर हा मेसेज रद्द करता येणार आहे.

यातील आणखी एक खास बाब म्हणजे आपल्याकडून रेकॉर्ड करण्यात आलेला व्हॉइस मेसेज अनसेंड करायची सुविधाही देण्यात आली आहे. यासाठी आपल्याकडून पाठवण्यात आलेला व्हॉइस मेसेज दिर्घकाळासाठी प्रेस करुन ठेवावा लागेल. त्याठिकाणी अनसेंड हा पर्याय येईल आणि व्हॉइस मेसेज डिलीट करता येईल. इन्स्टाग्रामला आपली मिळकत वाढवायची असल्याने तसेच युजर्सची संख्या वाढवायची असल्याने कंपनीने हे नवे फिचर आणले असल्याचे सांगितले आहे. यामुळे लोक व्हॉटसअॅपवरुन इन्स्टाग्रामकडे वळावेत असेही कंपनीचे म्हणणे आहे.