सध्या मोठय़ा प्रमाणावर वापरात असलेल्या बहुसंख्य औषधांमध्ये कमीत कमी एक घटक असा असतो, ज्याच्यामुळे रुग्णाला असोशीच्या बाधेचा (अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शन) सामना करावा लागू शकतो. अमेरिकी संशोधकांनी केलेल्या अभ्यासात ही बाब स्पष्ट झाली आहे.

औषधातील अक्रियाशील घटक (उपचार होत असलेल्या रोगावर थेट परिणाम न करणारा) म्हणून हे पदार्थ वापरले जातात. औषधी गोळ्यांची चव सुधारण्यासाठी, टिकाऊपणा (शेल्फ लाइफ) वाढवण्यासाठी किंवा त्यांचे अन्नमार्गात योग्यरीत्या शोषण व्हावे आदी हेतूंनी हे अक्रियाशील समजले जाणारे घटक मूळ औषधात मिसळले जातात. तोंडावाटे घेतल्या जाणाऱ्या अशा वेगवेगळ्या औषधांच्या संशोधकांनी चाचण्या घेतल्या असता, त्यापैकी ९० टक्के औषधांमध्ये असा एक तर घटक आढळून आला, ज्याच्यामुळे संवेदनशील रुग्णाला असोशीचा (अ‍ॅलर्जी) त्रास किंवा पचनमार्गात बाधा होऊ शकते. औषधांत आढळलेल्या अशा घटकांमध्ये लॅक्टोज, शेंगदाण्याचे तेल, ग्लुटेन आणि रासायनिक रंगद्रव्यांचा समावेश होतो, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.

याबाबत मॅसेच्युसेटस् इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीचे सी. जिओव्हॅनी ट्राव्हर्सो म्हणाले की, अ‍ॅलर्जी होईल अशी किंवा विपरीत प्रतिक्रिया होऊ शकेल अशी औषधे वापरणे हा डॉक्टरसाठी अखेरचा पर्याय असतो. वरील अभ्यासाला एका रुग्णाच्या अनुभवामुळे चालना मिळाली. उदराचा (सेलिआक) रोग झालेल्या या रुग्णाला लिहून दिलेल्या औषधात ग्लुटेन हा घटक वापरला गेला होता. त्याला होणाऱ्या त्रासाचे मूळ शोधताना आम्ही हजारो औषधांत वापरल्या जाणाऱ्या अक्रियाशील घटकांच्या विश्लेषणापर्यंत जाऊन पोहोचलो. संशोधकांनी अभ्यासलेल्या ४२ हजार ५२ औषधांत असे तीन लाख ५४ हजार ५९७ घटक आढळून आले.