निरोगी आरोग्यासाठी आठ तासांची झोप आवश्यक असल्याचे सर्वश्रुत आहे; परंतु रोज रात्री एक तास अधिक झोपल्याने शर्करायुक्त पदार्थाचे सेवन कमी करण्यास मदत होत असून आहारात सुधारणा होत असल्याचा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे. लठ्ठपणा आणि चयपचयाचे रोग यासाठी झोपेच्या सवयींमधील बदल कारणीभूत असतात. यामुळे संशोधकांनी झोपेच्या वेळेत वाढ केल्याने आहारात होणाऱ्या बदलांचा अभ्यास केला.

या अभ्यासात जास्त वेळ झोपल्याने शर्करेचे सेवन कमी होत असल्याचे किंग्ज महाविद्यालय लंडन येथील संशोधकांना आढळले. शर्करेसोबत कर्बोदकांचे सेवनदेखील कमी झाल्याचे संशोधकांनी नमूद केले. काही वेळ जास्त झोपल्याने शर्करेचे सेवन कमी होणे म्हणजेच आपल्या जीवनशैलीत सामान्य बदलामुळेदेखील लोक निरोगी आहाराचे सेवन करू शकतात हे सूचित करते, असे किंग्ज महाविद्यालय लंडनच्या वेन्डी हॉल यांनी म्हटले. या अभ्यासासाठी २१ जणांना निद्राविस्तार गटात सामील केले होते. त्यांच्या झोपेच्या वेळेत दीड तासाने वाढ करण्यासाठी त्यांना विशेष सल्ला देण्यात आला, तर २१ जणांच्या दुसऱ्या गटातील लोकांना झोपेच्या वेळेत बदल करण्याचा कोणताही सल्ला देण्यात आला नाही. सात दिवसांसाठी या प्रयोगात सहभागी झालेल्यांना त्यांच्या झोपेबाबत आणि आहाराबाबत नोंदी ठेवण्यास सांगितले. त्याचप्रमाणे झोपेच्या कालावधीची नोंदणी करण्यासाठी त्यांच्या मनगटाला मोशन सेन्सर यंत्र बांधून झोपण्याच्या सूचना दिल्या. झोपेच्या वेळेत एका तासाने वाढ केल्याने निरोगी आहाराची निवड लोक करत असल्याचे आमच्या अभ्यासात आढळून आले, असे किंग्ज महाविद्यालयाच्या हया अल खातीब यांनी म्हटले. हा अभ्यास अमेरिकन जर्नल ‘क्लिनिक न्यूट्रिशन’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे.